Published On : Sat, Oct 6th, 2018

किती शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर सरकार दुष्काळ जाहीर करणार आहे?: खा. अशोक चव्हाण

Advertisement

नंदुरबार :उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. खरीपाची पिके वाया गेली आहेत. तीव्र पाणीटंचाई आहे. तरीही सरकार दुष्काळ जाहीर करत नाही. आणखी किती शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर सरकार दुष्काळ जाहीर करणार आहे? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.

काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा दुस-या टप्प्याच्या तिस-या दिवशी आज नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे पोहोचली. शिरपूरहून शहाद्याकडे येताना रस्त्यात ठिकठिकाणी गावक-यांनी जनसंघर्ष यात्रेचे जंगी स्वागत केले. यात्रेत सहभागी नेत्यांनी शहादा परिसरातील जिनींग प्रेसिंग फॅक्टरीवर जाऊन कापूस उत्पादक शेतक-यांशी संवाद साधला. त्यानंतर शहादा येथे भव्य जनसंघर्ष सभा झाली. या सभेला मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर चौफेर टीका केली. ते म्हणाले की,भाजप सरकार शेतक-यांच्या जीवावर उठले आहे. राज्यात सोळा हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती आहे. तरीही सरकार अद्याप दुष्काळ जाहीर करत नाही. आणखी किती हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर सरकारला जाग येणार आहे? असा सवाल करून सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी खा. चव्हाण यांनी केली.

Gold Rate
16April 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver / Kg - 96,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजप-शिवसेनेच्या सत्ताकाळात दलित, आदिवासी व अल्पसंख्यांकांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काँग्रेस सरकारने या वंचित घटकांच्या विकासासाठी सुरु केलेल्या विविध कल्याणकारी योजनांच्या निधीत विद्यमान सरकारने कपात केली आहे. या देशातील एकही गरीब नागरिक उपाशी राहू नये म्हणून काँग्रेस सरकारने अन्नसुरक्षा कायदा केला. पण मोदी सरकार जाणिवपूर्वक त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करत नाही.

आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांना दिले जाणारे भोजन बंद करून त्यांच्या खात्यात भोजनाचे पैसे जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण सहा-सहा महिने विद्यार्थ्यांना पैसे दिले जात नाहीत. शिष्यवृत्तीचे पैसेही सरकार देत नाही. आदिवासींचे राशन बंद केले आहे. विविध सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी युपीए सरकारने नंदुरबार जिल्ह्यातून आधार कार्ड योजनेची सुरुवात केली. पण मोदी सरकारने आधारची सक्ती करून मोबाईलला आधार लिंक करून त्याचा वापर लोकांवर पाळत ठेवण्यासाठी केला जात आहे. आदिवासींचा वनजमिनीवरील हक्क अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस सरकारने वनहक्क कायदा आणला. पण केंद्र सरकार वनहक्क कायदा कमकुवत करून आदिवासींच्या जमिनी उद्योगपतींना देत आहे. काँग्रेस पक्षाने कायमच आदिवासींच्या हक्कांचे रक्षण केले आहे. वेळप्रसंगी लाठ्या काठ्या खाऊ पण आदिवासींच्या हक्काचे रक्षण करू असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

यासभेला मार्गदर्शन करताना राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, विद्यमान सरकार देशाच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. मोदींनी राफेल विमान खरेदीत मोठा घोटाळा केला आहे. म्हणूनच मोदी राफेल विमानाची खरेदी किंमत जाहीर करत नाहीत. भाजप सरकारने घोषणा केलेल्या बुलेट ट्रेन, समृध्दी महामार्ग या प्रकल्पात खूप मोठा भ्रष्टाचार झाला असून, सरकारचे त्याला संरक्षण आहे, असा आरोप त्यांनी केला.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, पद्माकर वळवी यांनीही या सभेला मार्गदर्शन करताना सरकारवर जोरदार टीका केली.

विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप, आ. के. सी. पाडवी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, नंदूरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे,अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत,सरचिटणीस पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा, भाई नगराळे, सचिव सत्संग मुंडे, तौफिक मुलाणी, शाह आलम शेख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनसंघर्ष यात्रा उद्या दि. ६ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, चांदवड मार्गे नाशिक शहरात जाणार आहे

Advertisement
Advertisement