नागपूर : कामठी येथे आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांत पालकमंत्र्याचंकडे शेकडो लोकांनी विविध प्रकारच्या तक्रारी नेल्या आणि सरकारी अधिकार्यांना संबंधित नागरिकांच्या तक्रारी त्वरित निकाली काढण्याचे निर्देश दिले. कामठीच्या तहसिल कार्यालयात आज हजारो नागरिकांनी या जनसंवाद कार्यक्रमाला आपली हजेरी लावली आणि सार्वजनिक व वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी आणि समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. या जनसंवाद कार्यक्रमात प्रामुख्याने माजी मंत्री अॅड. सुलेखाताई कुंभारे पूर्णवेळ उपस्थित होत्या. तसेच नगर परिषदेचे अध्यक्ष शहाजहा शफाअत खान हेही उपस्थित होते.
शिधा पत्रिका आहे पण धान्य मिळत नाही, नळ आहे पण पाणी येत नाही, रस्त्यावर ब्रेकर नाहीत, बोंडअळीच्या नुकसानापासून ते नुकसानभरपाईचे पैसे खात्यात जमा झाले नाही. आरोग्य सुविधांसाठी शासनाकडून मदत पाहिजे, अशा विविध प्रकारच्या तक्रारींचा पाऊस पालकमंत्र्यांसमोर आज पडला.
कामठी आणि परिसरातील नागरिकांच्या तहसिल स्तरावर किंवा नागपूर स्तरावर सुटणार्या तक्रारीं संबंधित अधिकार्यांना देण्यात आल्या. यात पाणीटंचाई, रस्ते, विजेचे पोल हटविणे, कर्जमाफीबद्दल, संजय गांधी निराधार योजना, सर्वांना मोफत घरे, आरोग्यविषयक समस्या, रस्त्यांच्या समस्या नागरिकांनी लेखी स्वरूपात केल्या. या सर्व अर्जाच्या विचार करताना ज्या समस्या कामठी स्तरावर सुटू शकतात अशा समस्या तात्काळ अधिकार्यांना सूचना देऊन सोडविण्याचे निर्देश देण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार बाबासाहेब टेळे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, महसूल, सिंचन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, भाजपाचे शहर अध्यक्ष विवेक मंगतानी, अनिल निधान, राजेश खंडेलवाल, नगरसेवक संजय कनोजिया, लालसिंग यादव, प्रतीक पडोळे, धर्मपाल मानवटकर, संध्या रायबोले, पिंकी वैद्य, हर्षा यादव, सरोज रंगारी, राजू पोलकमवार आदी उपस्थित होते.
राणीतलावनजीकच्या डंपिेग यार्डमधील ओला आणि सुका कचर्याचे विलगीकरण न करता न.प.द्वारे आग लावून कचरा जाळला जातो. परिणामी प्रभाग 15 मधील नयानगर, गौतमनगर, सुदर्शन नगर, समता नगर, सैलाबनगर, येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याची तक्रार नागरिकांनी नगरसेविका संध्या रायबोले यांच्या नेतृत्वात पालकमंत्री बावनकुळे यांना एका निवेदनातून दिली. या संदर्भात विभागाची बैठक लावून समस्या त्वरित सोडविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. दर महिन्यात दुसर्या रविवारी तहसिल कार्यालयात जनसंवाद बैठक राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.