नागपूर : ‘कोविड-१९’ विषाणूबाबत संपूर्ण जग भयभीत आहे. यामुळे या आजारातून बरे होऊन रुग्णालयातून घरी जाणे हे त्या रुग्णांसाठी व रुग्णालयासाठी गौरवाची बाब. म्हणूनच रुग्णालयातून बरे होऊन जाताना डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्या दाम्पत्याला निरोप दिला, तर त्यांनीही टाळ्या वाजवून प्रतिसाद देत रुग्णसेवेबाबत आभार व्यक्त केले.
इंडोनेशियाहून दिल्ली व नंतर नागपूर विमानतळावर आलेल्या या दाम्पत्याला २२ मार्च रोजी आमदार निवासात क्वारंटाइन केले. चंद्रपूर येथील रहिवासी असलेले हे ३९ वर्षीय पती व ३२ वर्षीय पत्नीला कोणतीच लक्षणे नव्हती. घरी जाण्यापूर्वी आपण आपली तपासणी करू या, असे म्हणून १३ व्या दिवशी पतीने आपले नमुने तपासणीसाठी पाठविले. ६ एप्रिल रोजी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना धक्काच बसला. त्याच दिवशी त्यांच्या पत्नीचे नमुने तपासले, त्यासुद्धा पॉझिटिव्ह आल्या. या दाम्पत्याला मेडिकलमध्ये दाखल केले. पहिल्या पाच दिवसानंतर व १४ दिवसानंतर २४ तासांच्या अंतराने घेतलेले सर्व नमुने निगेटिव्ह आले. यामुळे बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या रुग्णांसह मेडिकलमधून नऊ तर नागपुरातून १४ रुग्ण बरे झाले.
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे व औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमख डॉ. राजेश गोसावी यांनी ‘कोविड-१९’ वॉर्डात काम करणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. या दोन्ही रुग्णांना निरोप देण्यास स्वत: डॉ. मित्रा, डॉ. गावंडे, डॉ. मोहम्मद फैजल, डॉ. कांचन वानखेडे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. जयेश मुखी, मेट्रन मालती डोंगरे, सीएमओ डॉ. चेतन वंजारी, डॉ. विपुल मोदी व डॉ. श्याम राठोड उपस्थित होते.
रुग्णालयातून निरोप देण्यापूर्वी पती-पत्नीने सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाºयांशी संवाद साधला. त्यांनी रुग्णसेवेची प्रशंसा केली. विशेष म्हणजे, या दाम्पत्यासोबत आणखी तीन दाम्पत्य होते. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आमदार निवासातून चंद्रपूरला पाठविण्यात आले. हे दाम्पत्यही चंद्रपूरसाठी रवाना झाले असून पुढील १४ दिवस होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे.