रामटेक: रामटेक तुमसर रोडवरील नवरगाव परिसरातील टुरिस्ट ढाब्या जवळील शेतातील घरात पुष्पा खंडाते या तीस वर्षीय महिलेचा तिचा पती महेश खंडाते ह्याने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून ठार केल्याची थरारक घटना आठ एप्रिलच्या रात्री घडली.
महेश खंडाते हा गेल्या दोन महिन्यांपासून कैलास माणिक ठाकरे यांच्याकडे नोकर असून तो गायी ढोरांची देखरेख करायचा. तेथेच तो पत्नी व दोन वर्षीय मुलासोबत राहायचा. तसेच बाजूच्या खोलीत त्याची आई एकटी राहत होती.दिनांक आठ एप्रिल रविवारच्या रात्री अकरा नंतर पती व पत्नीचे भांडण झाले व त्यातूनच आरोपी महेशने धारदार शस्त्राने आपली पत्नी पुष्पा हिचा खून केला.मृतकाच्या सासूने सकाळी उठल्यावर रक्ताच्या थारोळ्यात सून दिसल्यावर शेतमालकास सांगितले. शेतमालकाने पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
खून करून आरोपी दोन वर्षाच्या मुलाला घेऊन पसार झाला. पोलिसांनी शिताफीने गावकऱ्यांच्या मदतीने आरोपीस साटक येथून ताब्यात घेतले.पोलिसानी कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक दीपक वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पीएसआय अनंता ठाकरे व पीएसआय वर्षा मते करीत आहे.