फिनलँड बनावटीच्या अत्याधुनिक मशीनचे लोकार्पण
नागपूर : शहरातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारा विकास आणि त्यात वाढणारी इमारतींची उंची या सर्व बाबींच्या अनुषंगाने इमारतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा तयार होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने मनपाच्या अग्निशमन यंत्रणेच्या ताफ्यात दाखल झालेली ३२ मीटर हॅड्रॉलिक प्लॅटफॉर्म ही फिनलँड बनावटीची अत्याधुनिक ब्राँटो स्कायलिफ्ट मशीन सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची भूमिका निभावेल, असा विश्वास मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला.
नागपूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणारे ३२ मी. हॅड्रॉलिक प्लॅटफॉर्म या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण फिनलँड बनावटीच्या ब्राँटो स्कायलिफ्ट मशीनचे बुधवारी (ता. १६) मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी लोकार्पण केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त महेश धामेचा, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, स्थानक अधिकारी तुषार बारहाते, यांत्रिकी अभियंता राजेश गुरनुले, ब्रिजबासी फायर सेफ्टी सिस्टिम कंपनीचे प्रतिनिधी कुणाल शाह आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आयुक्तांसह मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके आणि सहायक आयुक्त महेश धामेचा यांनी मशीनची पाहणी केली. मशीनची कार्यप्रणाली जाणून घेण्यासाठी मनपा आयुक्तांनी स्वत: पिंज-यात उभे राहून मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या सातव्या माळ्यापर्यंत पोहोचून मशीनच्या तांत्रिक बाबींची पडताळणी केली.
मेट्रो आणि इतर बाबींमुळे शहरात होत असलेल्या विकासामुळे शहरात आधी इमारतींच्या उंचीसाठी १५ मीटरपर्यंत असलेली परवानगी आता २४ मीटरपर्यंत झाली आहे. एकीकडे विकास होत असताना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुरक्षात्मक तयारी असणे आवश्यक आहे. ३२ मीटर क्षमतेचे हॅड्रॉलिक प्लॅटफॉर्म हे नागपूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे पाउल आहे, असेही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले. उंच इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना मशीनच्या सहाय्याने बाहेर काढता येउ शकते. मोठ्या इमारतींना लागणारी आग विझवण्यासोबतच लोकांचा जीव वाचविण्यासाठी ही मशीन महत्वाची भूमिका निभावणार आहे, असेही ते म्हणाले.
मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी मशीनसंदर्भातील तांत्रिक माहिती दिली. ते म्हणाले, शहरातील उंच इमारतींना अग्निशमन विभागाद्वारे ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येते. अशावेळी उंच इमारतीतील अग्निशमन व विमोचलन कार्य करण्यास यंत्र सामुग्री असणे आवश्यक आहे. विभागाकडे सध्या एकच ४२ मीटर उंचीचे टर्न टेबल लॅडर कार्यरत असून अरुंद रस्त्यांवरील उंच इमारतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने हॅड्रॉलिक प्लॅटफॉर्म खरेदी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. फिनलँड बनावटीचे ब्राँटो स्कायलिफ्ट मशीनची भारत बेन्झ या चेसीसवर ब्रिजबासी फायर सेफ्टी सिस्टिम प्रा.लि. मुंबई यांनी बांधणी करून मनपाच्या अग्निशमन विभागाला पुरवठा केला आहे. वाहनाची मुळ किंमत ८ कोटी १० लक्ष ६५ हजार ५४८ एवढी असून मशीनची ३ वर्ष हमी कालावधी (वॉरंटी) आहे. सदर ३२ मीटर उंच मशीन अत्याधुनिक असून यामध्ये वर जाणा-या पिंज-याला कॅमेरा लावण्यात आलेला असल्याने इमारतीत अडकलेल्यांची माहिती मिळू शकते. याशिवाय एकावेळी ५ जणांना वरून खाली उतरविता येते. ऑटोमेटिक सेन्सर असल्यामुळे आपात्कालीन परिस्थितीत मशीन स्वत: ऑपरेट होउ शकते, असेही त्यांनी सांगितले.