मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यात विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरले. काही दिवसांपासून शिंदे हे रजेवर असून राज्याला त्यांनी वाऱ्यावर सोडले, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता.
याबाबत आता स्वत: मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. मी सुट्टीवर नसून डबल ड्युटीवर आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच विरोधकांच्या आरोपांवरही त्यांनी पलटवार केला. साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी या मुद्द्यावर भाष्य केले.
महाबळेश्वर येथे पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, जिल्ह्यात आल्यापासून आपण विविध कामांचा आढावा घेत आहोत, लोकांच्या भेटीगाठी घेत असून अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहोत.
मी कधीच रजेवर जात नाही. आज मी तापोळा-महाबळेश्वर रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला, रस्त्याची पायाभरणी केली आणि पर्यटकांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी हिल स्टेशनच्या पायाभूत सुविधांबाबत जिल्हा अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
विरोधकांना आम्ही घरी बसवले आहे… त्यांच्याकडे आरोप करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आम्ही आरोपाला उलट-सुलट उत्तर देणार नाही, पण आमच्या कामातून त्यांना उत्तर देऊ, असेही शिंदे म्हणाले.