मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडले. मणिपूर आणि काश्मीरमध्ये घडणाऱ्या घटनांवरून त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. मणिपूरमध्ये घडलेल्या हिंसाचारावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी वर्षभरानंतर भाष्य केले.
मणिपूरबाबत सरसंघचालकांनी जे काही सांगितले त्याला पंतप्रधान गांभीर्याने घेणार आहेत का?, सरसंघचालक बोलल्यानंतर तरी पंतप्रधान मणिपूरला जाणार आहे का? कारण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात संघाची आम्हाला गरज राहिली नाही असं जेपी नड्डा म्हणाले होते. सध्या शपथविधी सोहळे सुरू आहेत.
काश्मीरात हल्ले होतायेत. त्याकडे सरकार लक्ष देणार आहे की नाही? मला सरकारच्या नाही तर देशाच्या भवितव्याची काळजी आहे. ४०० पार होणारे २४० वर अडकलेत. त्यामुळे मोदी सरकारचे नडीए सरकार झाले, असा घणाघात ठाकरे यांनी केला.
महाविकास आघाडीत कोणतेही अंतर्गत वाद नाहीत. मी निवडणूक झाल्यावर सात आठ दिवस बाहेर गेलो होतो. निवडणुकीची तारीख जवळ आल्याने सर्व पक्षाने विधान परिषदेचे उमेदवार जाहीर केले होते. दिल्लीतल्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून माझ्याशी आणि संजय राऊतांशीही फोनवरून संवाद झाला. त्यामुळे नाशिक, कोकण याबाबत आम्ही आमच्यात चर्चा सुरु असल्याचे ठाकरे म्हणाले.