नागपूर : दिशा सालियन बलात्कार आणि आत्महत्या प्रकरणात आता मोठा राजकीय गौप्यस्फोट करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते व आमदार अनिल देशमुख यांनी या प्रकरणात थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केले. श्याम मानव यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यांसंदर्भात अनिल देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी प्रतिज्ञापत्र करून आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप करण्यास मला सांगण्यात आले. मात्र मी त्याला नकार दिल्याने माझ्यावर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली, असे देशमुख म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा अत्यंत जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला. त्याने माझं देवेंद्र फडणवीसांशी अनेकदा बोलणं करून दिलं. त्यांनी माझ्याकडे एक लिफाफा पाठवला. त्यातल्या चार मुद्द्यांचं प्रतिज्ञापत्र करून देण्यास मला सांगण्यात आले. ते जर मी करून दिले असते तर तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार हे अडचणीत आले असते.
पहिल्या प्रतिज्ञा पत्रात उद्धव ठाकरेंवर मी खोटा आरोप लावायचा की त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला पैसे जमवायला सांगितले. दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरेंवर असा आरोप लावायला सांगितले की आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला आणि तिला गॅलरीतून ढकलून दिले. तसेच अजित पवारांवर गुटख्याच्या बाबतीत खोटा आरोप लावायचा, अनिल परबांवरही खोटा आरोप लावायचा अशी प्रतिज्ञापत्रे फडणवीस यांनी मला तयार करण्यास सांगितल्याचे देशमुख म्हणाले.