जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला पेटला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार संदीप क्षिरसागर यांच्या घरांना आंदोलकांना आग लावली. तर दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणावर आहेत. समाजाच्या आक्रमक पावित्र्यानंतर नोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पाटील यांच्या उपोषणाचा आज (३१ ऑक्टोबर) सातवा दिवस आहे. त्यांनी अन्न-पाण्याचा त्याग करून उपोषणाला सुरुवात केली होती, यामुळे त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. यामुळे मराठा आंदोलकांनी त्यांना पाणी पिण्याची विनंती केली होती. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिण्यास सुरुवात केली .
माझ्या समाजबांधवांनी काल सांगितले होते , आरक्षण दोन दिवस उशिरा मिळाले तरी चालेल तुम्ही पाणी प्या… त्यानंतर मी जाहीरपणाने कालपासून पाणी प्यायला लागलो आहे. मी पाणी प्यायल्यानंतर मराठा समाज शांत होणार आणि माझ्या मतानुसार महाराष्ट्रातला मराठा समाज १०० टक्के शांत झाला आहे.
आपण जर खास क्षत्रिय मराठा असू तर आपण लढायचं असतं. आत्महत्या करून मरायचं नाही. मीही लढतच आहे, मी अशा मरणाला घाबरणार नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून लढा, कुणी आत्महत्या करू नका आणि उद्रेक करू नका, असेही मनोज जरांगे पाटील समाजबांधवांना उद्देशून म्हणाले आहेत.