माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठे मिशन समजून मी नागपूरचा कायापालट करेन, असे वक्तव्य डॉ. आशिष देशमुख यांनी केले असून प्रत्येक घरात आर्थिक संपन्नता पोहोचविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा डॉ. आशिष देशमुख यांच्याकडे नागपूरच्या विकासासाठी सर्वोत्तम व्हिजन असल्याचे दिसून पडते. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे ते कॉंग्रेसचे उच्च-शिक्षित व अभ्यासू उमेदवार असून नागपूर व विदर्भाच्या विकासाचा त्यांनी अभ्यास केला आहे. नागपूरला रोजगाराभिमुख औद्योगिक नगरी व वल्ड क्लास सिटी बनविणार, असा निश्चय त्यांनी केला आहे.
“भाजपच्या काळात नागपूरचा विकास झाला नाही. आपण चांगल्या प्रकारे नागपूरचा सर्वांगीण विकास करू शकतो. नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात आणावा, अशी मागणी मी विधानसभेत भाजपा सरकारकडे सातत्याने केली. त्या मागणीकडे दुर्लक्ष करून मुख्यमंत्री फडणवीसांनी असाच एक इनलँड प्रकल्प नागपूरला देऊ, असे आश्वासन विधानसभेत दिले होते, परंतु ते पूर्ण केले नाही. नाणारसारखा रिफायनरी प्रकल्प नागपूर/विदर्भात यावा म्हणून मी जोरदार प्रयत्न करणार जेणे करून त्यातून नागपूर/विदर्भासाठी ३ लाख रोजगार निर्माण होतील. तेलंगाणाच्या मल्लवरम् ते राजस्थानच्या भिलवाडा (गुजरात स्टेट पेट्रोनेट लिमिटेड) या गॅस पाईपलाईनचे काम नागपूरच्या बुटीबोरीपर्यंत पूर्णत्वास नेऊन त्यावर आधारित मोठे उद्योग प्रकल्प उभारणार जेणेकरून उद्योगधंद्यांमधील गुंतवणूक वाढेल व रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होतील”, असे डॉ. आशिष देशमुख म्हणाले.
ते पुढे म्हणाले,”नागपूरलगतच्या एमआयडीसी, मिहान, सेझमध्ये आयटी, एसटीपी, बीटीओ व अनेक चांगले उद्योगधंदे आणण्याचा प्रयत्न करणार, नव्या योजना/सवलती लागू करून बंद असलेले उद्योगधंदे सुरु करून औद्योगिक विकास करणार. टेक्सटाईलमधील गुंतवणूक वाढवून तिथे विदर्भातील कापूस वापरून शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळावा म्हणून प्रयत्न करणार. फूड प्रोसेसिंग, कृषी प्रक्रिया, संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरु करणार जेणेकरून उत्पादन, गुणवत्ता, ब्रँडीग, साठवणूक, शीतगृहे, विक्रीव्यवस्था इ. बाबतीत विकास होईल व मोठा रोजगार निर्माण होईल.”
“नागपूरला डिफेन्स मॅनिफॅक्चरिंग व एक्सप्लोसीव्हच्या दृष्टीने पोषक असे वातावरण सरकारच्या सहकार्याने निर्माण करणार. नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी असल्यामुळे लॉजिस्टीक वेयर हाऊसिंग गोडाऊन तयार करून त्याच्या माध्यमातून उद्योग व प्रचंड रोजगार निर्मिती करणार. नागपूर हे टायगर कॅपिटल असून नागपूर हे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास यावे म्हणून नागपूरपासून २५० किमीच्या परिसरात जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करणार. यातून हजारो युवक-युवतींना उपजीविकेचे साधन उपलब्ध होईल. नागपूर कित्येक दशकांपासून भारताचे ‘हेल्थ हब’ म्हणून ओळखल्या जाते. उत्कृष्ट हेल्थ केयर इंडस्ट्री/हॉस्पिटलसाठी राज्य सरकारची पॉलिसी नागपूरला लागू करणार जेणेकरून मेडिकल टुरीझमसाठी सर्व दृष्टीने डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन, अटेंडन्ट, फार्मासिस्ट यांना मोठे काम मिळून हेल्थ केयरला लागणारी एक इको सिस्टीम उभारल्या जाईल व त्यातून हजारो लोकांना रोजगार मिळेल. प्रत्येक घरात आर्थिक संपन्नता पोहोचविण्याचा माझा संकल्प आहे”, असे ते शेवटी म्हणाले.
दि. १७ ऑक्टोबरला सोनेगाव, सहकारनगर, जयप्रकाशनगर, सोमलवाडा, राजीवनगर, स्नेहनगर या परिसरात पदयात्रेच्या माध्यमातून डॉ. आशिष देशमुख यांनी जनसंपर्क साधला. महिला सुरक्षा व सक्षमीकरणासाठी त्यांनी परिसरातील महिलांशी संवाद साधला.