Published On : Tue, Jan 28th, 2020

साडेनऊच्या ठोक्याला तुकाराम मुंढे कार्यालयात, हजेरीचं पंचिंग मशीन बिघडलं, केबिनबाहेर जुन्या आयुक्तांची पाटी बदलताना धावपळ

Advertisement

नागपूर : कडक शिस्तीचे आणि कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज नागपूर महापालिकेचे आयुक्त (IAS Tukaram Mundhe Nagpur Commissioner) म्हणून कार्यभार स्वीकारला. सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी महापालिकेच्या मुख्यालयात दाखल होत, तुकाराम मुंढेंनी महापालिकेचा (IAS Tukaram Mundhe Nagpur Commissioner) कार्यभार हाती घेतला. पहिल्याच दिवशी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली.

महत्त्वाचं म्हणजे तुकाराम मुंढे हे आयुक्तपदी येणार असल्याच्या बातमीनंतरच, नागपूर मनपाचे कर्मचारी वेळेत येण्यास सुरु झाले. मात्र आजचा योगायोग म्हणजे कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी वापरात येणाऱ्या पंचिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याने, कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

Advertisement
Today's Rate
Sat 21 Dec. 2024
Gold 24 KT 76,400/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

इतकंच नाही तर तुकाराम मुंढे हे कार्यालयात आल्यानंतर, त्यांच्या केबिनबाहेर जुन्या आयुक्तांच्या नावाची पाटी होती. ती पाटी बदलून तुकाराम मुंढेंच्या नावाची पाटी लावताना, कर्मचाऱ्यांची एकच धावाधाव झाली. तुकाराम मुंढे केबिनमध्ये गेल्यानंतर, कर्मचाऱ्यांनी कोणताही आवाज न करता, केबिनच्या दरवाजावरील पाटी बदलून, तुकाराम मुंडेंच्या नावाची पाटी लावली.

कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती
राज्याचे एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून कारभार पाहणारे तुकाराम मुंढे यांची 21 जानेवारी रोजी नागपूरचे आयुक्त म्हणून बदली झाली. मात्र तुकाराम मुंढे यांनी नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्याआधीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली. नागपूर मनपातील बरेचसे कर्मचारी 23 जानेवारीपासून चक्क वेळेवर मनपा कार्यालयात दाखल होत आहेत. विशेष म्हणजे एरव्ही बऱ्याचदा वेळेवर न येणारे अधिकारीही दहाच्या ठोक्याला मनपाच्या कार्यालयात दाखल होत आहेत.

भाजपच्या बालेकिल्ल्यात कडक शिस्तीचा अधिकारी
नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. महाविकासआघाडीचे नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी नागपूरचा गड असलेल्या पालिकेत तुकाराम मुंढेंची बदली केली आहे. मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे येत्या काळात ही बाब भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हं आहेत.

येत्या दोन वर्षात नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंढे यांची आयुक्तपदी बदली करण्यात आल्याचे बोललं जात आहे. तर दुसरीकडे भाजपची सत्ता असलेल्या मनपात तुकाराम मुंढेंना मुद्दाम आणलं का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

तुकाराम मुंढे यांची कारकीर्द
नागपूर जिल्हा परिषदेवर 2008 साली तुकाराम मुंढे यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाली. त्याच दिवशी त्यांनी शाळेला भेटी दिल्या आणि गैहजर शिक्षकांचं निलंबन केलं. वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्याने काही डॉक्टरांनाही निलंबित केलं.

सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यांना वाळू माफियांच्या रोषाचाही सामना करावा लागला. पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री सोडून इतरांचं व्हीआयपी दर्शन बंद केलं.

नवी मुंबईत महापालिका आयुक्तपदी बदली झाली. नवी मुंबईत आल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केली आणि तिथेच तुकाराम मुंढे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले. नवी मुंबईतही त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला.

नवी मुंबईतून पुण्यात पीएमपीएमएल अध्यक्षपदी बदली झाली. पुण्यात गेल्यानंतर त्यांनी तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलचा महसूल वाढवण्यासाठी अनेक पाऊलं उचलली, नियम बदलले आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा दिल्या. पण पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे त्यांची कारकीर्द पुन्हा एकदा चर्चेत आली.

पुण्यातून तुकाराम मुंढे यांची बदली नाशिकला करण्यात आली. तिथे ते किमान एक वर्ष पूर्ण करतील, अशी अपेक्षा होती. पण एका वर्षाच्या आतच त्यांची मंत्रालयात बदली करण्यात आली. नागरिक तुकाराम मुंढेंच्या कामाचं नेहमीच कौतुक करतात आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असतात. पण राजकारण्यांना त्यांचं एवढं वावडं का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Advertisement