नागपूर : राज्यात सत्तेत आल्यापासून महायुती सरकारने शेतकऱ्यांची केवळ दिशाभुल केली आहे. अनेकदा सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणा केल्या. मात्र अद्यापही त्या पूर्ण केल्या नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे सरकारने जर शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर नागपूरात होणाऱ्या अधिवेशनात त्यांना धारेवर धरू, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी नागपुरात दिला.
सरकारकडून हमी भावाची घोषणा करण्यात आली. मात्र पण सोयाबीन, कापसाचे दर पडले आहेत. २०१३ च्या तुलनेत कापसाला दर नाही. खतांचे भाव गगनाला भिडले आहे. यंदा धानाचे पीक निघाले आहे. ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस द्यावा, अशी मागणी आहे. व्यापाऱ्यांच्या घशात धान गेल्यावर घोषणा करणार का ? ऊस उत्पादकांच्या मागणीसाठी राजू शेट्टी लढत आहेत. सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवे, अन्यथा अधिवेशनात सरकारला सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
इंडिया आघाडीतील लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू झाली आहे. कुठल्या जागा कुणासाठी सोडाव्या यासंदर्भात चर्चा सुरु आहे. इंडिया आघाडीच्या जागावाटपात कुठलाही अडथळा येणार नाही, अशा दावाही त्यांनी केला. प्रियंका गांधी यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली. हा भाजपचा निवडणूक आयोग झाला, असा घाणघातही त्यांनी केला.