नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाइम्स नाउ आणि इटीजी रिसर्चच्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अर्थात एनडीएला ४०० जागांचा आकडा ओलांडणे अवघड असल्याचा दावा सर्वेक्षणाच्या आधारे करण्यात आला आहे.मात्र भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमताने पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यात यशस्वी होऊ शकते असेही नमूद करण्यात आले आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेते एनडीएच्या जागा वाढतील. मात्र त्यांनी ४०० जागांचे जे लक्ष्य निर्धारित केले आहे, ते गाठणे कठीण असल्याचे सर्वेक्षणातून समोर येते आहे.तर विरोधी पक्षांची इंडिया आघाडी १०० जागांच्या जवळ पोहोचण्याची शक्यता आहे. या दोन आघाड्यांच्या खेरीज वायएसआर कॉंग्रेसला २१-२२ जागा दाखवण्यात आल्या आहेत.
नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलाला १०-११ जागा, तर अन्य ११-१५ जागा अन्य पक्षांना अथवा अपक्षांना मिळू शकतात.तर भाजप पक्षाला ३३३ ते ३६३ जागा मिळू शकतील. कॉंग्रेस पक्षाला ५० चा आकडा गाठणेही खडतर ठरेल असे नमूद करण्यात आले. किंबहुना कॉंग्रेसला २८ ते ४८ च्या दरम्यान जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कॉंग्रेसचा सहकारी पक्ष द्रमुकला २४ ते २८ जागा, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसला १७ ते २१ जागा मिळू शकतात. दिल्लीतील आम आदमी पार्टीला पहिल्यांदाच ५ जागा मिळण्याचे अनुमान आहे.