नागपूर : एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना कुणबी संघटनेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्याने कुणबी संघटनेत संतापाची लाट पसरली आहे. यापार्श्वभूमीवर नागपुरात आज विविध कुणबी संघटनांनी बैठक घेतली. तसेच सरकारवर हल्लाबोल केला.
मराठावाड्यात राहणाऱ्या मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या वाट्याचे आरक्षण त्यांना देण्यात येऊ नये, असे कुणबी समाजाचे म्हणणे आहे. सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी शनिवारपासून लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात येईल आणि त्यानंतरही सरकारने योग्य ते पाऊल उचलले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा अखिल कुणबी समाजाने दिला आहे.
मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी शुक्रवारी कुणबी समाजाची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर शनिवारपासून समाजाच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे.
दरम्यान या मुद्द्यावरुन माजी मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अवंतिका लेकुरवाळे, काँग्रेसचे नरेंद्र जिचकार आणि अखिल कुणबी समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली.या बैठकीत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये. असे झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. महाराष्ट्र बंद पुकारला जाईल. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारला यासंदर्भात कळविण्यात आले आहे. असे शहाणे म्हणाले.