मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर केला. अंडरवर्ल्डशी संबध असल्याचे कथित प्रकरण आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात २३ फेब्रवारी २०२२ रोजी नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. परंतु, किडनी संबंधित असलेल्या दुर्धर आजारामुळे मलिक यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. मलिक यांच्या जामीनावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केले.
शरद पवार यांचे नवाब मलिक यांच्यावर खूप उपकार आहेत. पवार यांनीच त्यांना राजकारणात अनेक संधी दिल्या आहेत. मलिक यांनीही खूप उत्तम काम केले आहे. त्यामुळे मला वाटते की नवाब मलिक हे शरद पवार यांच्याबरोबर राहतील.मलिक यांना भाजपाकडून ऑफर असल्याची चर्चा सुरू आहे. यावरही खडसे यांनी आपले मत मांडले.
नवाब मलिक हे जर भाजपात गेले तर तिथे जाऊन स्वच्छ होऊन ते बाहेर येतील. त्यामुळे एखाद्या वेळेस भाजपा त्यांना ऑफर देऊ शकते. कारण भारतीय जनता पार्टीकडे लोकांना स्वच्छ करण्याची मशीन आहे, असा टोला खडसे यांनी लगावला.