नागपूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले. यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. विधानसभेत महविकास आघाडीच्या पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारांच्या वाढलेल्या संख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
यावरून आता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी 2029 ची निवडणूक कामठी विधानसभेतून लढवावी, असे आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार असून चितपट केल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला. पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते एका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधींवर निशाणा साधला.
तसेच त्यांना खले आवाहन केले. 27 वर्षानंतर दिल्लीच्या तख्तावर भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. दिल्लीच्या विजयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने डोळे बंद करून विश्वास टाकला, असेही बावनकुळे म्हणाले.
दिल्लीच्या विधानसभेत भाजपला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. अशातच दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना खुले आव्हान दिले आहे.
राहुल गांधी म्हणतात की, कामठी विधानसभेत गडबड झाली आहे. त्यामुळे माझे राहुल गांधी यांना आव्हान आहे की, 2029 ची विधानसभा निवडणूक त्यांनी माझ्या विरोधात लढवावी. मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढून जिंकून दाखवेन असे बावनकुळे म्हणाले. आमचे कार्यकर्ते प्रामाणिक आहे. राहुल गांधी जर लढायला तयार झाले, तर मी त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
बावनकुळे यांनी यासोबतच महविकास आघडीच्या इतर नेत्यांवर हल्लाबोल केला.
डबल इंजिन सरकार विकास करू शकते, हे देशाच्या जनतेने स्वीकारले आहे. मोदी यांच्या नेतृत्वात जनतेला विकास दिसत आहे. त्यामुळे देशाच्या 75 टक्के भूभागावर भाजपचे सरकार आहे. दिल्लीतील विजय ऐतिहासिक आहे. काँग्रेस स्वकर्तृत्वाने दिल्लीत हरली आहे. काँग्रेसने जनतेच्या विकासाचा मार्ग निवडला नाही. आता काँग्रेस मतदान यंत्राला दोष देईल. सकाळचे नऊचे महान प्रवक्ते बोलायला सुरुवात करतील, असे म्हणत बावनकुळे यांनी नाव न घेता संजय राऊत यांना टोला लगावला.
दरम्यान महायुतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरही बावनकुळे यांनी भाष्य केले.
बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे नाराज नाहीत. ते त्याग करणारे नेते आहेत. महायुती सरकार व्यवस्थित सुरू आहे. इतकेच नाही तर पुढची 25 वर्षे महाराष्ट्रात महायुती सरकार चालवेल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.