नागपूर : गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या वाढत्या प्रमाणावरुन समृद्धी महामार्ग जास्तच चर्चेत आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या महामार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर रहदारीसाठी हा मार्ग सुरु करण्यात आला होता. प्रवाशांची वाढती वर्दळ तसेच अपघाताचे वाढते सत्र पाहता समृद्धी महामार्गावर रिल्स बनवणाऱ्यांना थेट तुरुंगात जावे लागणार आहे.
समृद्धी महामार्गावर रिल्स बनवणाऱ्यांसाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावर रिल्स काढणाऱ्यांना ५०० रुपये दंड आणि १ महिना कारावासाची शिक्षा करण्यात येईल. महामार्ग वाहतूक पोलिसांनी याबाबत माहिती देत प्रवाशांना इशारा दिला आहे.
समृद्धी महामार्गावर वाहन थांबवून रिल्स बनवणे किंवा व्हिडिओ शूट करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच, २८३ या कलमान्वये सार्वजनिक रस्त्यावर धोका किंवा असुविधा निर्माण होईल, असा आरोप ठेवत संबंधित वाहनचालक वा प्रवाशांवर २०० रुपये दंडासह कारावासाची दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग वाहतूक पोलीस विभागाने दिली.