मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ज्यातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराच्या वक्तव्याचा निषेध केला.कुणाल कामराने आमच्यावर कविता करावी. राजकीय व्यंग करावं. आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ. पण अशाप्रकारे सुपारी घेऊन जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे आपण लोक आहोत.
पण हे स्वातंत्र्य जर स्वैराचाराकडे जात असेल तर मग ते मान्य होणार नाही. कुणाल कामराचा पूर्व इतिहास पाहिला तर देशातील उच्च पदस्थ लोकांच्या संदर्भात मग ते पंतप्रधान असो की मुख्य न्यायधीश असो किंवा न्यायव्यवस्था असो यांच्या संदर्भात खालच्या दर्जाचा बोलणं आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास राहणार नाही अशाप्रकारचं बोलणं ही याची कार्यपद्धती आहे.
मुळात या व्यक्तीला कॉन्ट्रोवर्सी तयार करुन प्रसिद्धी मिळवण्याचा एक हव्यास आहे. या हव्यासातून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा त्याने प्रयत्न केला. खरंतर या कामराला हे माहिती पाहिजे की २०२४ च्या निवडणुकीने हे ठरवले की कोण उद्दार आहे आणि कोण गद्दार आहे. हा काय महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का? असेही फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं की बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा वारसा कोणाकडे आणि तो वारसा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेला त्यांनी दिला, असेही फडणवीस म्हणाले. कामराने जर त्याने संविधान वाचलं असतं तर त्याने अशाप्रकारचा स्वैराचार केला नसता. कुणाल कामराने आमच्यावर कविता करावी, राजकीय व्यंग करावे, आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ. पण अशाप्रकारे सुपारी घेऊन जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.