नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेत सुषमा अंधारेंवर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याच्या मागणीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा वाद पेटला. येत्या आठ दिवसांत अंधारे यांनी दिलगिरी पत्र दिले नाही तर त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची परवानगी देऊ,असा इशारा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिला.
नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, सत्यता पडताळून निराकरण न करता विधाने करणे योग्य नाही. त्यामुळे अंधारे यांनी आठ दिवसांत लिखित दिलगीरी व्यक्त न केल्यास, त्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याचे आदेश देईल,असे गोऱ्हे सभागृहात म्हणाल्या. त्यामुळे आता अंधारे माफिनामा लिहणार की हक्कभंगाच्या कारवाईला सामोरे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले.
काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना नीलम गोऱ्हे यांनी मला बोलू दिले नाही, असा आरोप विरोधक करत आहेत, हा मुद्दा भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडला. धंगेकर यांचा विधानपरिषदेशी काहीही संबंध नाही, तरीही त्यांनी माहिती न घेता तसे विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याची परवानगी मला द्यावी, अशी विनंती केली होती. यावर सभापती गोऱ्हेंनी याबाबतचा एक व्हिडिओ माझ्याकडे देखील आला आहे, आमदार धंगेकर नव्हे तर शिवसेनेच्या एका प्रवक्त्यांनी तसे विधान केले आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्यांच्या या विधानावर सभागृहातील विरोधीपक्षनते अंबादास दानवे यांनी सभापती गोऱ्हे यांनी धंगेकरांना बालू द्यायला पाहिजे होते, असे भाष्य केले.
या सर्व मुद्द्यांवर आता दरेकर यांना आक्षेप नोंदवत अंधारे या देखील शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत. त्यांनी असे विधान केले असेल तर त्यांच्या विरोधात हक्कभंग आणला पाहिजे, असे सांगितले.
यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा विषय गंभीर आहे. एकच खोटी गोष्ट तीन तीन वेळा सांगितली की, ती खरी वाटायला लागते. जोसेफ गोबेल्स तंत्र हेच आहे. सभापतींविषयी विधाने होत असतील तर ते योग्य नाही. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यात डान्स बार बंदीचा निर्णय घेतल्यावर डान्स बार संघाचे अध्यक्ष मनजीतसिंग यांनी आर. आर.
पाटील यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. मी त्यांच्या पक्षाचा नव्हतो, तरीही मी त्याबाबत आक्षेप घेऊन हक्कभंग आणला होता. त्यांना ९० दिवसांची शिक्षा झाली होती.ते पुढे म्हणाले, ‘आज सोशल मीडिया अतिशय विस्तारला आहे. प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. अशा स्थितीत त्यावर गंभीर विचार झाला पाहिजे. त्यामुळे याबाबत निश्चित एक समिती तयार करून आचारसंहीता करावी, अशी सूचना केली.