नागपूर : भाजपने पराभवाच्या भितीपोटी थांबवून ठेवण्यात आलेल्या महापालिका, नगरपरिषद निवडणुका तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुका घेऊन दाखवा असे आव्हान माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी भाजपला केले. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकीचा निकाल लागताच भाजपने बहुमत आपल्याच पक्षाला मिळाल्याचे सांगत सर्वत्र डंका वाजवला. परंतु कोणत्या ग्राम पंचायत मध्ये त्यांची सत्ता आली याची यादी मात्र देत नाही. तसेच आकडेवारीही ते जाहीर करीत नाहीत. राज्यातील शेतकरी, बेरोजगारी, महागाई, आरक्षणाच्या प्रश्नावर गंभीरता दाखवली तर अनेकांना फायदा होईल.
मात्र या प्रश्नांकडे भाजप नेत्यांचे लक्ष नाही,असा आरोप देशमुख यांनी केला.त्यामुळे जनतेमध्ये भाजपाच्या विरुद्ध संतापाची लाट पसरली आहे . यामुळे सत्ताधारी भाजप पराभवाच्या भीतीपोटी राज्यातील महापालिका, नगरपरिषद निवडणुका घेत नाही.
इतके नाही तर पुण्यात गिरीष बापट यांच्या निधनामुळे आणि बाळू धानोकर यांच्या निधनामुळे चंद्रपूर येथील लोकसभेची जागा रिक्त आहे. इतर राज्यात रिक्त झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुका घेण्यात आला. परंतु पुणे व चंद्रपूर लोकसभा येथे पोटनिवडणूक सत्ताधारी भाजपने का घेतली नाही ? असा संतप्त सवाल देशमुख यांनी उपस्थित केला.