Published On : Thu, Jan 16th, 2020

जनतेच्या तक्रारींचे निराकरण न केल्यास संबंधित अधिका-यांवर कारवाई

महापौर संदीप जोशी : लक्ष्मीनगर झोनमधील ‘जनता दरबार’

नागपूर : स्वच्छता, पाणी, उद्यानातील सुविधा अशा अनेक समस्यांवर त्वरीत कार्यवाही करून नागरिकांना दिलासा मिळू शकतो. मात्र या समस्यांसाठीही नागरिकांना चकरा माराव्‍या लागतात. नागरिकांच्या लहान मोठ्या सर्व समस्या ऐकून त्या सोडविण्यासाठी आधी तक्रार निवारण शिबीर घेण्यात आले. आता ‘जनता दरबार’च्या माध्यमातून या तक्रारी सोडविण्यात येत आहेत. संबंधित अधिका-यांनी गांभीर्याने सर्व तक्रारींचे निराकरण करावे. आठवडाभरानंतर या सर्व तक्रारींवर केलेल्या कार्यवाहीचा पाठपुरावा करण्यात येईल. यानंतरही जनतेच्या तक्रारींचे निराकरण न झाल्यास संबंधित अधिका-यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.

Gold Rate
Tuesday25 Feb. 2025
Gold 24 KT 86,600 /-
Gold 22 KT 80,500 /-
Silver / Kg 96,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गुरूवारी (ता.१६) लक्ष्मीनगर झोनमधील ‘जनता दरबार’मध्ये महापौर संदीप जोशी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती तारा (लक्ष्मी) यादव, शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक सर्वश्री लखन येरवार, लहुकुमार बेहते, किशोर वानखेडे, नगरसेविका सोनाली कडू, पल्लवी शामकुळे, मिनाक्षी तेलगोटे, वनिता दांडेकर, माजी नगरसेवक ओमप्रकाश (मुन्ना) यादव, लक्ष्मीनगर झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, कार्यकारी अभियंता धनंजय मेंडुलकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

‘जनता दरबार’मध्ये ७५ नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. अतिक्रमण, मलवाहिनी, उखडलेले रस्ते, कचरा, विद्युत दिवे, मोकळ्या भूखंडावरील अस्वच्छता, मोकाट कुत्रे, डुकरांचा त्रास, उद्यानातील असुविधा अशा विविध विषयांवर यावेळी तक्रारी मांडण्यात आल्या.

अतिक्रमणच्या संदर्भातील तक्रारींवर संबंधित अधिका-यांनी तक्रार असलेल्या ठिकाणी भेट देउन मोका पाहणी करावी व त्यानंतरच पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. आवश्यकता असलेल्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त घेउनच कारवाई करण्याचे त्यांनी सांगितले. प्रियदर्शनी सोसायटी येथील मलवाहिनीची समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मलवाहिनी साफ करण्याबाबत स्थानिक नागरिकांकडून होत असलेला विरोध लक्षात घेता सदर ठिकाणी संबंधित पोलिस अधिका-यांच्या उपस्थितीत कार्यवाही करण्याचेही महापौरांनी निर्देशित केले.

अनेक भागांमध्ये, उद्यानांमध्ये विद्युत खांबांवर एलईडी लाईट न लावण्यात आल्याने सदर ठिकाणी असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. यावर विद्युत विभागाने तातडीने आवश्यक कार्यवाही करणे, याशिवाय उद्यानांना सुरक्षा भिंत लावणे, वॉकिंग ट्रॅकची व्यवस्था, ग्रीन जिम याबाबत उद्यान विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मोकळ्या भूखंडाबाबत लवकरच मोठी कारवाई
रहिवासी क्षेत्रामध्ये असलेल्या मोकळ्या भूखंडावर कचरा टाकला जातो. त्यामुळे परिसरात अस्वच्छता असते. यासंदर्भात ‘जनता दरबार’मध्ये अनेक तक्रारी मांडण्यात आल्या. मोकळ्या भूखंडासंदर्भात मनपातर्फे निर्णय घेण्यात आला आहे. लवकर संपूर्ण शहरातील मोकळ्या भूखंड मालकांना अल्टिमेटम देउन निर्धारित कालावधीमध्ये बांधकाम न केल्यास मनपातर्फे मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

…तर स्वच्छता निरीक्षक व कर्मचा-यांवर कारवाई
झोन अंतर्गत अनेक ठिकाणी अस्वच्छता असून स्वच्छता कर्मचारी नियमीत येत नसल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी मांडली. प्रभागांतर्गत नियुक्त स्वच्छता कर्मचा-यांनी वस्तीमध्ये गेल्यानंतर तेथील नागरिकांकडे आपल्या येण्याची वेळ नोंदवून काम सुरू करावे. याशिवाय महिन्याच्या शेवट नागरिकांकडून स्वच्छता कर्मचा-यांच्या हजेरी व कामगिरीबाबत प्रतिसाद व स्वाक्षरी घेण्यात यावी. संबंधित सफाई कर्मचा-यांच्या कामावर स्वच्छता निरीक्षकांची देखरेख असणे आवश्यक आहे. नागरिकांकडून स्वच्छता कर्मचा-यांच्या कार्याबाबत नकारात्मक प्रतिसाद असल्यास संबंधित स्वच्छता कर्मचा-यासह स्वच्छता निरीक्षकावरही कारवाई करण्याचा इशारा यावेळी महापौर संदीप जोशी यांनी दिला.

Advertisement