मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जातो. जर राष्ट्रवादीचे ३० हून अधिक आमदार अजित पवारांबरोबर गेले तर राष्ट्रवादीला विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद सोडावं लागेल. त्यामुळे विरोधी पक्षांमधील काँग्रेस पक्षाकडे हे पद येईल. त्याच पार्श्वभूमीवर काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला.
विरोधी पक्षनेते पदाबद्दल विधानसभेचे अध्यक्ष हे पक्षांच्या आमदारांच्या संख्याबळानुसार निर्णय घेतील. आमची संख्या एकूण ९ आमदारांनी कमी झाली आहे.
उरलेले आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच आहेत. या सगळ्या प्रकरणात आम्हाला काँग्रेसशी स्पर्धा करायची नाही. काँग्रेस आणि आम्ही एकत्रित बसून यावर (विरोधी पक्षनेते पदाबद्दल) निर्णय घेऊ. आमच्या आमदारांची संख्या कमी असेल असे सिद्ध झाले तर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होईल, परंतु यासाठी वेग लागेल असे जयंत पाटील म्हणाले.