मुंबई : “राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे”अशा आशयाची जाहिरात काल प्रत्येक वृत्तपत्रात आली. यानंतर राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस यांना डावलण्यात येत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर आज शिंदे गटाकडून दुसरी जाहिरात प्रसिद्ध करत कालची चूक सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काल वृत्तपत्रात जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये कुणीतरी खोडसाळपणा केला होता. आज शिंदे गटाने चांगल्या भावनेने जाहिरात देऊन चूक दुरुस्त करण्याचा मोठा प्रयत्न केला, असे बावनकुळे म्हणाले. जेव्हा आपण युती करतो, तेव्हा एखादी चूक आमच्याकडून झाली असेल तर ती चूक आम्ही दुरुस्त केली पाहिजे.
त्यांच्याकडून (शिंदे गट) चूक झाली तर त्यांनी दुरुस्त केली पाहिजे. आता यामध्ये बोलण्यासारखं काही नाही. हा विषय आता संपला आहे, असे बावनकुळे म्हणाले.