नागपूर : राज्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात इतकी निर्लज्ज व शब्द देऊन मागे हटणारी सरकार मी पहिल्यांदाच पाहत आहे. नुकतेच पार पडलेल्या अधिवेशनात विरोधी पक्ष नेते यांनी लॉकडाऊनच्या काळात वीजकापणीचा विरोध करीत सरकारला धारेवर धरले. त्यावर स्वत: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यापुढे वीजकापणी बंद होणार असल्याचे सभागृहात सांगितले. मात्र अधिवेशन संपताच सभागृहाबाहेर त्यांनी वीजकापणी सुरु राहणार असल्याचे वक्तव्य माध्यमांसमोर केले. उर्जामंत्री यांनी सुद्धा कुठलीही मानवता न दाखवता वीजकापणी सुरु राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे हे सरकार जनतेच्या हिताशी संवेदनशील नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरकार निर्लज्ज, उर्जामंत्री हतबल, जनता हलाकान
नागपूर शहरात चार-चार मंत्री असताना शहरातील जनतेला वा-यावर सोडले की काय? अशी स्थिती आहे. कोरोना आटोक्यात होत नाही, तर जबरन लॉकडाऊन करण्याची घाई पालकमंत्री राऊत यांनी दाखविली, मात्र या लॉकडाऊनच्या काळात वीजकापणी मात्र सुरूच ठेवली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे नागपुरातील जनता हलाकान आहे. अनेकांच्या नोक-या सुटल्या, अनेक दुकाने बंद झाली, व्यापार बुडाला, बँकेचे कर्ज थकबाकी झाले. अशा परिस्थितीत वीजबिल थकीत होणे स्वाभाविक आहे.
उर्जामंत्री यांनी सुरुवातीला सवलतीच्या मोठ-मोठ्या घोषणा केल्या, मात्र राज्य सरकारने त्यांच्या घोषणेला प्रतिसाद दिलाच नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात फक्त “खुर्चीसम्राट” म्हणूनच राऊत यांची ओळख आहे की काय? अशी शंका निर्माण होते. बिलवसुलीसाठी मात्र त्यांनी लगीनघाई केली असून जनतेला मात्र कसलाही दिलासा न देता वीज बिल भरण्याची सक्ती करण्याचे आदेश त्यांनी दिले. किमान लॉकडाऊनच्या काळात तरी मंत्री महोदय दया दाखवतील, असे वाटत होते. मात्र उर्जामंत्री यांनी शहराचे पालकमंत्री असून देखील मानवता दाखविली नाही. लाज-लज्जा सोडून शहरातील जनतेला व वीजग्राहकांना परेशान करण्याचा सपाटा उर्जामंत्री यांनी केलेला आहे.
मंत्री महोदय मानवतेला जागा, खुर्चीचा नाद सोडून जनहिताचे निर्णय घ्या आणि निदान लॉकडाऊनच्या काळात तरी वीजकापणीचे आदेश मागे घ्या, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे.