– महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : चाचणीसंदर्भातील शंकांसंदर्भात बैठक
नागपूर : एका ठिकाणी केलेली टेस्ट निगेटिव्ह येते आणि दुसऱ्या ठिकाणी टेस्ट केली तर पॉझिटिव्ह येते यामुळे नागरिकांमध्ये शंका निर्माण झाल्या. त्यातून भीतीचे वातावरण तयार होते. यासंदर्भात नेमके काय आहे, हे जाणून घेण्याकरिता महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात गुरुवारी (ता. १३) बैठक पार पडली. यासंदर्भातील शास्त्रीय कारण जाणून घेतले आणि टेस्ट निगेटिव्ह आली असेल तरी पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले असेल तर नागरिकांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.
बैठकीला ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, उपायुक्त निर्भय जैन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई उपस्थित होते. चाचणीसंदर्भात विरोधाभास आणि शंका निर्माण होत असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी दिली. नागरिकांमध्ये यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून यासंदर्भात नेमके काय कारण आहे, हे जनतेसमोर जायला हवे, अशी सूचना केली. यावर माहिती देताना डॉ. योगेंद्र सवाई यांनी सांगितले की, कोव्हिड-१९ विषाणूचे संक्रमण झाले अथवा नाही हे तपासण्यासाठी ज्या चाचण्या केल्या जातात, त्या दोन प्रकारच्या आहेत. एक चाचणी म्हणजे ‘ॲण्टीजिन टेस्ट’ तर दुसरी चाचणी म्हणजे ‘आर.टी.-पीसीआर टेस्ट. यातील ॲण्टीजिन टेस्ट ही रॅपिड टेस्ट आहे. हे स्क्रीनिंग टेक्निक आहे. एखादे प्रतिबंधित क्षेत्र असेल, हाय रिस्क पेशंट असेल, अथवा चाचणी अत्यंत तातडीने करवून घ्यायची असेल तर ॲण्टीजिन टेस्ट करण्यात येते. या चाचणीत जर व्यक्ती पॉझिटिव्ह आला तर तो पॉझिटिव्हच असतो. त्यानंतर मग आर.टी.-पीसीआर टेस्ट करण्याची गरज नाही. परंतु ॲण्टीजिन टेस्टमध्ये जर व्यक्ती निगेटिव्ह आला असेल तर त्याला संक्रमण झाले नसेल म्हणूनच निगेटिव्ह आला असेल किंवा त्याला केवळ लक्षणे आहेत म्हणून तो निगेटिव्ह आला असेल. लक्षणे असूनही ॲण्टीजिन टेस्टमध्ये व्यक्ती निगेटिव्ह आला तर त्याने आर.टी.-पीसीआर टेस्ट करणे आवश्यक आहे.
आर.टी.-पीसीआर टेस्ट ही निदानाचे निश्चितीकरण करणारी टेस्ट आहे. याला गोल्ड स्टॅण्डर्ड फ्रंटलाईन टेस्ट फॉल डायग्नोसीस ऑफ कोव्हिड-१९ असेही म्हटले जाते. ॲण्टीजिन टेस्ट मध्ये लक्षणे असतानाही निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीने निश्चितीकरण करण्यासाठी आर.टी.-पीसीआर चाचणी करून घेणे आवश्यक आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या शरीरात पुढील ६० दिवसापर्यंत विषाणूंचे अस्तित्व असू शकेल व तो पुढेसुद्धा कधीही पॉझिटिव्ह येईल. परंतु लक्षणांच्या दोन दिवस अगोदर व लक्षणांच्या पाच दिवसानंतर असे सात दिवस व्यक्ती हा विषाणूचा संसर्ग देऊ शकेल व तद्नंतर त्याला पुढील तीन दिवसांत लक्षणे नसल्यास तो विषाणूचा संसर्ग त्याच्याकडून इतरांना होऊ शकणार नाही. त्यामुळे लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तींना दहा दिवसानंतर घरी सोडण्याबाबतचा निर्णय भारत सरकारद्वारे घेण्यात आलेला असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्याच्या धर्तीवर व्हिटॅमिन सी आणि डी च्या गोळ्या नागरिकांना वितरीत करता येतील का, याबाबतही महापौर संदीप जोशी आणि ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी माहिती जाणून घेतली. औरंगाबाद येथे गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्यांची तपासणी करण्यासाठी खासगी डॉक्टरांची चमू तयार करण्यात आली आहे. त्यासाठी केवळ १० हजार रुपये आकारले जातात. असा पॅटर्न नागपुरातही राबविता येईल का, जेणेकरून गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांमध्ये भीती राहणार नाही, यावर विचारविनिमय करून निर्णय घेण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. गड्डीगोदाम आणि इतर काही भागात पॉझिटिव्ह आल्यानंतरही गृह विलगीकरणात असलेले रुग्ण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी सामाजिक संस्थांनी केल्या आहेत. यावर तातडीने आरआरटी पथकाच्या माध्यमातून कार्यवाही करावी, असे निर्देशही महापौर संदीप जोशी यांनी दिले. कोव्हिड-१९ संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळापासून आशा वर्कर इमानेइतबारे काम करीत आहे. त्यांना मनपाकडून वाढीव प्रोत्साहन भत्ता देता येईल का, याचीही तपासणी करण्याची सूचना महापौरांनी केली.