मुंबई : राज्यात शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपसोबत सरकार स्थापन केले. इतकेच नाही तर सत्ता संघर्षाच्या लढाईत निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना नाव हे एकनाथ शिंदे गटाला दिले.त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर पक्ष संघटना पुन्हा मजबूत करण्यासाठी मोठे आव्हान आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची प्रखर मुलाखत शिवसेना पॉडकास्टवर खासदार संजय राऊत घेत आहेत. या मुलाखतीचा एक टिझर प्रसिद्ध झाला आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपाला खुले आव्हान दिले.आज संपूर्ण भाजप पक्ष माझ्याविरोधात आहेत.
तरीही तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती का वाटते? उद्धव ठाकरे हा एक व्यक्ती नसून बाळासाहेबांचा विचार आहे. मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळत असेल तर जरूर संपवा, मग माझ्या वडिलांचे आशीर्वाद, जनतेची साथसोबत आणि तुमची ताकद बघू असा इशाराच त्यांनी दिला आहे. तसेच या मुलाखतीत संजय राऊतांनी वर्षभरापूर्वी तुमच्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेले असं म्हटल्यावर उद्धव ठाकरेंनी वाहून गेले नाही, तर खेकड्यांनी धरण फोडले असा टोला एकनाथ शिंदे यांना ठाकरेंनी लगावला आहे.
उद्धव ठाकरेंनी पाठित खंजीर खुपसला म्हणून तुम्ही शिवसेना फोडली मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं त्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी फोडली?असा उलट सवालही ठाकरेंनी मुलाखतीमध्ये उपस्थित केल्याचे पाहायला मिळत आहे.