Published On : Thu, Apr 7th, 2022

पांढरकवडा तालुक्यात अवैध वीटभट्ट्याचा सुळसुळाट

Advertisement

पांढरकवडा : तालुक्यामध्ये शेकडो वीटभट्ट्या विनापरवाना सुरू आहेत. या वीटभट्ट्या विनापरवाना माती उत्खनन करीत असून सरकारचा कोट्यवधीचा महसूल यामुळे बुडाला आहे. या शिवाय या वीटभट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू असतानास कोणीही प्रदूषण नियंत्रण मंडळाची परावनगी घेतलेली नाही. हे सर्व सुरू असताना तलाठी, मंडळाधिकारी यांचे होणाऱ्या दुर्लक्षामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पांढरकवडा तालुक्यात अनेक गावांमध्ये वीटभटट्या सुरू आहेत. तालुक्यात एकत्रित पाहिल्यास यांची संख्या फार मोठी आहे. या वीटभट्ट्या सुरू करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वांत महत्त्वाची म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी आवश्यक आहे. या शिवाय या वीटभट्ट्यांसाठी मोठ्या प्रमाणात माती लागते ही माती उत्खनन करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये त्याची रॉयल्टी भरून परवानगी घेणे आवश्यक आहे; मात्र, अशी परावनगी कोणीच घेतलेली नाही व मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन केले आहे. यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.

Advertisement

या शिवाय माती तयार झाल्यावर व विटा तयार झाल्यावर त्याचा वाहतूक परवाना घेणे आवश्यक आहे. कारण वीट वाहतूक करणारे ट्रक हे अवजड असतात यांच्यामुळे रस्त्याचे नुकसान होते. तसेच अपघातही होतात. यामुळे याची वाहतूक परवानगी घेणे बंधनकारक आहे;

मात्र, तशी परावनगी घेतली जात नाही. अनेक वेळा या विटांची ज्या वाहनामधून वाहतूक होताना दिसते त्यांना अशी वाहतूक करण्यास परवानगी नसते; मात्र, तरीही ती राजरोस सुरू आहे. या सर्व वीटभट्ट्या असो किंवा नदीपात्रातील बेकायदा वाळूउपसा असो, याची इत्यंभूत माहिती मंडळाधिकारी व तलाठ्यांना असते; मात्र, ते कधीच कारवाई करीत नाहीत किंवा वरिष्ठांनाही माहिती देत नाहीत. याचे कारण ‘सबका साथ सबका विकास’ या धोरणाप्रमाणे सर्व सुरळीत सुरू आहे. या सर्वांना आठवडा हजेरी मिळत असेल तर ते कारवाई करणार कशी.

योगेश पडोळे
प्रतिनिधि पांढरकवडा