सतरंजीपुरा झोनमध्ये नागरिकांचा आक्रोश : महापौरांच्या ‘जनता दरबार’
मध्ये १०० च्या वर तक्रारींवर सुनावणी
नागपूर: इतवारी क्षेत्रात रस्त्यावरील अतिक्रमण, मस्कासाथमध्ये अवैध बांधकामामुळे रस्ता बंद, अतिक्रमण, लालगंज येथे अवैध अतिक्रमण, इंदिरा नगर येथील सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण, पाचपावली भागातील रोड रुंद करणे अतिक्रमणाच्या अशा अनेक समस्या बुधवारी (ता.२६) महापौर संदीप जोशी यांच्या सतरंजीपुरा झोनमधील ‘जनता दरबार’मध्ये मांडण्यात आल्या.
सतरंजीपुरा झोनमधील जनता दरबारात महापौरांनी १००च्या वर तक्रारींवर सुनावणी केली. सर्व तक्रारींची दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी तक्रारकर्त्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी महापौर संदीप जोशी यांच्यासह झोन सभापती अभिरूची राजगिरे, माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर, नगरसेवक सर्वश्री रमेश पुणेकर, संजय चावरे, नितीन साठवणे, संजय महाजन, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, नगरसेविका शकुंतला पारवे, सहायक आयुक्त विजय हुमने आदी उपस्थित होते.
सतरंजीपुरा झोनच्या जनता दरबारामध्ये अतिक्रमण व अवैध बांधकामासंदर्भातील सर्वाधिक तक्रारी मांडण्यात आल्या. झोन अंतर्गत इतवारी क्षेत्रामध्ये नेहमीच वाहतुकीची समस्या असते. उड्डाण पूल व इतवारी क्षेत्रात पार्कींग प्लाझा तयार करण्याची मागणी यावेळी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. मगनलाल हिरोमल अँड सन्स व इतर व्यावसायिकांकडून नियमबाह्यरित्या जागेचा दुरूपयोग होत असल्याने मनपाने जागा त्वरीत ताब्यात घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. संबंधित तक्रारीबाबत मोका पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.
पाचकवश महादेव मंदिर पाचपावली परिसरातील मोबाईल टॉवर हटविण्याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र अजूनपर्यंत कोणतिही कारवाई करण्यात आली नाही. यासंदर्भात संबंधित विभागाने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. राणी दुर्गावती नगर आदिवासी क्वॉर्टर मैदानात ग्रीन जिम लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली. सदर जागेची पाहणी करून तातडीने नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे महापौरांनी निर्देशित केले.
इंदिरा गांधी नगर येथे सार्वजनिक जागेवर भंगार साहित्य ठेवण्यात आले आहे. सदर जागेवरील अतिक्रमण त्वरीत हटविण्याबाबत कार्यवाहीचे निर्देशही त्यांनी दिले. नंदगिरी रोड पाचपावली येथील दिव्यांगाने ई-रिक्षा मिळण्याकरीता मागील वर्षाभरापासून अर्ज करूनही ई-रिक्षा न मिळाल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. संबंधित विभागाने उमेदवाराच्या अर्जाबाबतच्या कार्यवाहीची माहिती सादर करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.
जनता दरबारमध्ये संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.