नागपूर : जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कांद्री शिवारातील आरटीओ चेकपाेस्ट जवळ केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करण्यात ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली. यादरम्यान ४० पैकी २३ गुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर कारवाईदरम्यान सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार हृदय नारायण यादव यांनी दिली.
माहितीनुसार, जबलपूर-नागपूर महामार्गावरून नागपूरच्या दिशेने गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या महामार्गावरील कांद्री शिवारातील चेकपाेस्टजवळ नाकाबंदी करून एमएपी-४१/११४२ क्रमांका ट्रक अडवला आणि झडती घेतली. पाेलिसांना त्या ट्रकमध्ये ४० जनावरे काेंबली असल्याचे तसेच त्यातील २३ गुरांचा गुदमरून मृत्यू झाला.
या गुरांना कत्तलखान्यात नेण्यात येत असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले. पाेलिसांनी पंचनामा करून मृत गुरांची विल्हेवाट लावली आणि उर्वरित १७ जनावरांना देवलापारच्या गाेविज्ञान केंद्रात पाठविण्याची व्यवस्था केली. या कारवाईत एकूण सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक कार्तिक सोनटक्के, सहायक फाैजदार संजय पायक, हवालदार नितेश डोकरमारे, चेतन ठाकरे यांच्या पथकाने केली.