विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लवकरच मिळणार लाभ
नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील दिव्यांगांच्या उत्थानासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा शहरातील सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी तातडीने या योजनांची अंमलबजावणी करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.
शासनातर्फे राबविण्यात येणा-या दिव्यांगांच्या योजनांचा नागपूर शहरातील लाभार्थ्यांना मिळालेला लाभ आणि प्रलंबित असलेली प्रकरणे या सर्व बाबींचा मंगळवारी (ता.१) महापौर दयाशंकर तिवारी यांनी आढावा घेतला. महापौर कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीत उपमहापौर मनीषा धावडे, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, उपायुक्त रवींद्र भेलावे, समाजविकास अधिकारी दीनकर उमरेडकर आदी उपस्थित होते.
कर्णबधिर दिव्यांगांना शस्त्रक्रियेकरिता अर्थसहाय्य, दिव्यांगांना वैयक्तिक स्वयंरोजगाराकरिता, दिव्यांग बचत गटांना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य, मतीमंत घटकातील दिव्यांगांना निर्वाह भत्ता, दिव्यांगांसाठी शिष्यवृत्ती व व्यवसाय प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य, दिव्यांगांना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञानाकरिता अर्थसहाय्य, प्रधानमंत्री आवास योजना घटक क्रमांक ३ अंतर्गत मनपा, नासुप्र व म्हाडातर्फे बांधण्यात आलेल्या व बांधण्यात येत असलेल्या बांधकामाकरिता सोडत पद्धतीने निवड झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना शासन अनुदान २.५ लक्ष वजा करून उर्वरित रक्कमेच्या ५० टक्के अर्थसहाय्य, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणा-या दिव्यांग खेळाडूंना आर्थिक सहाय्य, अंत्योदय योजने अंतर्गत दिव्यांगांना ई-रिक्षा वाटप, मोटोराईज ट्रायसिकल या सर्व योजनांच्या संदर्भात यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सविस्तर माहिती जाणून घेत आढावा घेतला.
कर्णबधिर दिव्यांगांना शस्त्रक्रियेकरिता अर्थसहाय्य या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात राज्य शासनाचे परिपत्र असून या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ६ लक्ष रुपये सहाय्य करण्याची तरतूद आहे. या योजनेचा गरजूंना लाभ मिळावा व त्यांना लवकर उपचार घेता यावे यासाठी ही योजना नियमांच्या अधिन राहून खासगी रुग्णालयांमध्येही लागू करण्याबाबत कार्यवाही करण्याचे महापौरांनी निर्देशित केले. दिव्यांगांना वैयक्तिक स्वयंरोजगाराकरिता १ लाख रुपये आर्थिक सहाय्य मनपातर्फे करण्यात येणार आहे. हे सहाय्य दोन टप्प्यांमध्ये पात्र लाभार्थ्यांना करण्यात यावे. याशिवाय योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यामार्फत मिळालेल्या अर्थसहाय्याचा योग्य वापर होत आहे अथवा नाही याची शहानिषा करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर यंत्रणा तयार करण्याचेही महापौरांनी निर्देश दिले. प्रत्येक झोनमध्ये नियुक्त समुह संगठकांद्वारे झोनस्तरावर दिव्यांगांचे किमान एक बचत गट तयार करून त्या मार्फत त्यांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करण्याचे महापौरांनी निर्देशित केले.
मतीमंत घटकातील दिव्यांगांना निर्वाह भत्ता देण्यासंदर्भात ६ लाभार्थ्यांची यादी विभागाकडे प्राप्त झाली असून त्यांना लवकरच योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती अतिरिक्त् आयुक्त दीपककुमार मीना यांनी यावेळी दिली. दिव्यांगांच्या शिष्यवृत्ती संदर्भात शिक्षणाधिका-यांशी समन्वय साधून याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. स्मार्ट सिटीतर्फे दिव्यांगांना ई-रिक्षा देण्यात येणार आहेत. यासंदर्भात स्मार्ट सिटीशी समन्वय साधून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांना ई-रिक्षा लवकरात लवकर प्रदान करण्यात याव्यात यासंदर्भात कार्यवाही करण्याचेही महापौरांनी निर्देश दिले.
प्रधानमंत्री आवास योजना घटक क्रमांक ३ अंतर्गत मनपा, नासुप्र व म्हाडातर्फे बांधण्यात आलेल्या व बांधण्यात येत असलेल्या बांधकामाकरिता सोडत पद्धतीने निवड झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना शासन अनुदान २.५ लक्ष वजा करून उर्वरित रक्कमेच्या ५० टक्के अर्थसहाय्य योजनेबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात असून पात्र लाभार्थ्यांना येत्या काही दिवसांत योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
महिला व बालकल्याण समितीच्या अंतर्गत समाजविकास विभागाद्वारे शिलाई मशीन देण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे यांनी यावेळी सूचना केली. कोरोनामुळे मृत पावलेल्या कुटुंबियांना प्राधान्याने शिवणयंत्र देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.