Published On : Sun, Sep 8th, 2019

झोपडपट्टीधारकांना नोंदणीकृत पट्टे तात्काळ वितरित करा – देवेंद्र फडणवीस

Advertisement

नागपूर : शहराच्या विविध भागातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वत:च्या मालकीचे घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी पट्टे वाटपाची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून झोपडपट्टीधारकांना राहत असलेल्या जागेचे नोंदणी केलेले पट्टयांचे वाटप तात्काळ करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्यात.

रामगिरी येथे खामला, रामबाग, बोरकर नगर, तसेच सरस्वती नगर येथील झोपडपट्टयांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना नोंदणी केलेल्या पट्टयांचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. झोपडपट्टयात राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे मिळावे यासाठी सर्व नियम शिथिल करण्यात आले असून पात्र ठरणाऱ्या प्रत्येक पट्टेधारकांना मालकी हक्काचे पट्टे तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेत.

Gold Rate
Wednesday 07 Jan. 2025
Gold 24 KT 77,400 /-
Gold 22 KT 72,400 /-
Silver / Kg 89,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी महापौर श्रीमती नंदा जिचकार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी श्रीमती लिना बुधे, नगरसेवक प्रकाश भोयर, श्रीमती पल्लवी शामकुळे, विजय चेटुले, लखन येरावार प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरात नझुल, महानगरपालिका, तसेच खाजगी जागांवर असलेल्या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वितरणाला सुरुवात झाली असून खाजगी जागेवर असलेल्या 50 झोपडपट्टयांमध्ये पट्टेधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळावे यासाठी नियमात विशेष तरतुद करण्यात आली आहे. अशा झोपडपट्टयांचे सर्वेक्षणसोबतच मोजणीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. त्यानुसार पट्टे वाटपाची प्रक्रिया प्राधान्याने राबवावी, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलेत.

झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे नोंदणी करण्यासाठी आवश्यक यंत्रणा वाढविण्यात येईल. त्यानुसार पात्र पट्टेधारकांना संबंधित यंत्रणेकडून मिळालेल्या डिमांडनुसार पैसे भरावे व आपल्या नावाने पट्टा करुन घ्यावा. मालकी हक्काचे पट्टे देतांना आखिव पत्रिका सुध्दा नावाने होणार असल्यामुळे स्वत:च्या मालकची व हक्काची जागा मिळणार आहे. संबंधित नगरसेवकांनी मालकी हक्काचे पट्टे वितरणासाठी नागरिकांना सहकार्य करुन पट्टे वाटपाची प्रक्रिया पूर्ण करावी, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नझुलच्या जागेवर असलेल्या झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाची प्रक्रियेला गती देण्यात आली असून 34 झोपडपट्टयांपैकी 23 झोपडपट्टयांमधील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मालकी हक्काचे पट्टे मिळण्यासाठी 2447 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील 5 झोपडपट्टया असून 3 झोपडपट्टयांचे प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मालकी हक्काचे पट्टे मिळण्यासाठी 248 नागरिकांना अर्ज केले असून त्यापैकी 113 अर्ज मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित अर्जांबाबत तात्काळ निर्णय घेण्यात येवून सर्व पात्र झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वितरित करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

महानगरपालिकेच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना पट्टयांचे वितरण सुरु असून नागरिकांनी तात्काळ डिमांडनुसार पैसे भरुन आपल्या नावाने मालकी हक्काचा पट्टा करुन घ्यावा, असेही यावेळी आवाहन करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात खामला येथील शिवनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या श्रीमती विमल शितल हिंगणकर व राजेश हिंगणकर, कैलाश रतन सुतार व श्रीमती राधादेवी सुतार, श्रीमती कल्पना कैलाश पाटील, श्रीमती संगिता शाम चौधरी, श्रीमती आरती कैलाश समुद्रे यांना महसूल विभागातर्फे नोंदणी केलेले जागेचे कागदपत्र देण्यात आले.

महानगरपालिकेच्या रामबाग झोपडपट्टीत राहणाऱ्या श्रीमती सोनाली राजू तितरमारे, श्रीमती आशा सरजू राहूलकर, श्रीमती माया अशोक ठवरे, श्रीमती आरती शंकर गजभिये यांना नोंदणीकृत मालकी हक्काचे पट्टे वितरीत करण्यात आले. बोरकर नगर झोपडपट्टी येथील श्रीमती हिरा ओमप्रकाश लुढेकर, श्रीमती अर्चना मलखाम अहेरवार, सरस्वती नगर येथील श्रीमती पुष्पा दिनेश सर्पा, श्रीमती राजसबाई धर्मदास भागवत, श्रीमती नितु रुपेश मंडपे यांना मालकी हक्काचे पट्टे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले.

Advertisement