नागपूर: प्रभाग क्र. ३७ मधील अनेक ले-आऊटमधील रस्ते निर्माणामध्ये वीज कंपनीच्या अपूर्ण कामांचा अडथळा येत आहे. ही अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा आणि अंतर्गत रस्ते निर्माण कार्यातील अडथळे दूर करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.
प्रभागातील नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि काही कामांमुळे नागरिकांना होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी महापौर नंदा जिचकार, शिक्षण समिती सभापती आणि प्रभागाचे नगरसेवक प्रा. दिलीप दिवे यांनी प्रभागाचा दौरा केला. यावेळी वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता कुंदन भिसे, लक्ष्मीनगर झोनचे उपअभियंता रवींद्र मुळे व वीज कंपनीचे कंत्राटदार उपस्थित होते.
प्रभाग क्र. ३७ मधील अनेक ले-आऊटमधील रस्ते वीज कंपनीने केबल टाकण्याच्या कामासाठी खोदून ठेवले. मोठमोठे केबल रस्त्यांच्या बाजूला उघडे पडले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ही परिस्थिती ‘जैसे थे’ आहेत. नागपूर महानगरपालिकेतर्फे अंतर्गत रस्त्यांचे काम मंजूर आहे. पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करायचे आहेत. मात्र, वीज कंपनीच्या अपूर्ण कामांचा त्यात अडथळा आहे. महापौर नंदा जिचकार यांनी शनिवारी (ता. २१) प्रतापनगर चौक, जीवनछाया नगर, दीनदयाल नगर, गावंडे ले-आऊट आदी भागांचा दौरा केला. यावेळी परिसरातील नागरिकांशीही संवाद साधला. नगरसेवक प्रा. दिलीप दिवे यांनी वीज कंपनीच्या अपुऱ्या कामांमुळे नागरिकांना किती समस्यांना तोंड द्यावे लागते, याची माहितीच कार्यकारी अभियंता कुंदन भिसे यांना दिली.
महापौर नंदा जिचकार यांनी नागरिकांच्याही समस्या ऐकून घेतल्या. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने विकासकामे प्रगतीपथावर आहे. तीन ते चार विभागांची कामे एकत्र असल्यामुळे अडथळा येतो. हा अडथळा नेमका काय, हे जाणून घेण्यासाठीच आज दौरा करीत असल्याचे त्यांनी नागरिकांना सांगितले. वीज कंपनीमुळे ज्या रस्त्यांचे काम थांबले आहे, ती कामे वीज कंपनीने तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता भिसे यांनी कंत्राटदारांना सदर कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी लक्ष्मीनगर झोनचे झोनल अधिकारी तिडकेही उपस्थित होते.