अक्षय तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक शुभ दिवस मानतात. दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. हा दिवस सर्व कामाला शुभ मानला आहे. कारण या दिवशी केलेल्या कार्याचे शुभ फल मिळते. म्हणून एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात.
या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते. ह्या दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने कार्य केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.
पुण्याईचा साठा वाढणण्यासाठी अक्षय तृतीयेचे पूजन सांगितले आहे. अक्षय तृतीयेला केलेली पूजा ही घराण्यातील अनेक दोष नष्ट करून कुटुंबाचा उध्दार करते.
- महत्व:-
– या दिवसापासून सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे काहींचे मत आहे.
– या दिवशी श्री बद्रीनारायणाचे द्वार उघडतात.
– नर-नारायणाने या दिवशी अवतार घेतला होता.
– श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते.
– वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होतात आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.
महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैतरगौरीची स्थापना व पूजन करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ (किंवा भिजवलेले हरबरे) आणि पन्हे देतात.
त्या हळदीकुंकू समारंभांचा (गौरी उत्सवाचा) अक्षय तृतीया हा शेवटचा दिवस असतो.तसेच या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामजी पूजा करण्यात येते. राजस्थान,पश्चिम’ बंगाल,ओरिसा,उत्तर भारत आणि दक्षिण भारतात अश्या विविध प्रांतात अक्षय तृतीयाा साजरी केली जातेे.