नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने ७ ऑगस्ट रोजी पोर्णिमा दिवसाचे आयोजन धरमपेठ येथील कॉफी हाऊस चौकात करण्यात आले होते. यावेळी परिसरातील दुकानदारांना आणि रहिवाशांना वीज बचतीचे महत्त्व पटवून देण्यात आले.
आ. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात आयोजित या कार्यक्रमाला आ. अनिल सोले यांच्यासह माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, मनपाचे कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तव चॅटर्जी उपस्थित होते.
ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी यावेळी परिसरातील दुकानदारांना, रहिवाशांना वीज बचतीचे महत्त्व सांगितले. ‘पोर्णिमा दिवस’ उपक्रमाची माहिती दिली. सदर उपक्रम आ. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला. या उपक्रमाला नागपूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला. आजही ज्या भागात या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते त्या भागातील नागरिक उपक्रमात सहभागी होतात. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक पोर्णिमेला रात्री ८ ते ९ या वेळेत अनावश्यक विजेचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येते आणि वीज उपकरणे बंद करण्यात येतात. परिणामी, आतापर्यंत ९५ हजारावर किलोग्रॅम कार्बनचे उत्सर्जन थांबविण्यात यश आले आहे. या उपक्रमाची प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केली आहे.
७ ऑगस्ट रोजी राबविण्यात आलेल्या या उपक्रमात मार्गदर्शन करताना आ. अनिल सोले म्हणाले, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या पुढाकाराने नागपूर महानगरपालिका राबवित असलेला ह्या उपक्रमाची दखल देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. यापुढे प्रत्येक पोर्णिमेला नागरिकांनी स्वत: प्रेरीत होऊन विजेचा अनावश्यक वापर टाळावा आणि एक तासाकरिता वीज उपकरणे बंद ठेवावीत, असे आवाहन केले.
उपक्रमात ग्रीन व्हिजीलचे स्वयंसेवक सुरभी जैस्वाल, विष्णूदेव यादव, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, विकास यादव, अमोल भलमे, लिपिशा काचोरे आदी सहभागी झाले होते.