भिवसेनखोरी येथील वंदे मातरम जन स्वास्थ्य केंद्राचे लोकार्पण
नागपूर : प्रत्येक नागरिकाला वेळेवर आरोग्य सुविधा मिळणे अत्यावश्यक आहे. नागपूर शहरातील गोरगरीब जनतेच्या सुविधेसाठी नागपूर महानगरपालिकेने वंदे मातरम जन स्वास्थ्य केंद्र सुरू केले आहे. या केंद्रांमुळे गोरगरीब आणि गरजूंना वेळेवर नाममात्र दरामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असून शहरातील जनतेसाठी मनपाने घेतलेला हा महत्वपूर्ण पुढाकार आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या कार्याचे कौतुक केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील गोरगरीब नागरिकांच्या सुविधेसाठी वंदे मातरम् जन स्वास्थ्य केंद्राची सुरूवात करण्यात येत आहे. शहरातील विविध भागात साकारत असलेल्या या केंद्रापैकी भिवसेनखोरी भीमसेना नगर बौद्ध विहार येथील केंद्राचे मंगळवारी (ता.२) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मंचावर महापौर दयाशंकर तिवारी, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, आरोग्य समिती उपसभापती विक्रम ग्वालबंशी, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नासुप्रचे विश्वस्त ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले, माजी महापौर माया इवनाते, नगरसेविका रूतिका मसराम, नगरसेविका डॉ.परिणिता फुके, रूपा राय, ज्येष्ठ नगरसेवक संदीप जाधव, सुनील अग्रवाल, नगरसेवक निशांत गांधी, नगरसेवक प्रमोद कौरती, नगरसेविका संगीता गि-हे, उपायुक्त मिलींद मेश्राम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, उपअभियंता अनिल गेडाम आदी उपस्थित होते.
भारतीय सेनेतील मरणोपरांत महावीर चक्र प्रदान कर्नल विकुमल्ला संतोष बाबू यांना हे हेल्थ पोस्ट समर्पित करण्यात आले आहे. सदर हेल्थ पोस्टच्या संचालनाची जबाबदारी वर्धा येथील सद्भावना ग्रामीण विकास संस्थेने स्वीकारली आहे. यावेळी या संस्थेचे पदाधिकारी सदाशिव पळसकर व मिलींद भगत उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, आपले शरीर सुदृढ असेल तर जीवनात प्रगती करता येते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी महानगरपालिकेतर्फे हे जनस्वास्थ्य केंद्र आपल्या वस्तीमध्ये सुरू करण्यात आले आहे. या केंद्राद्वारे नागरिकांना वेळेवर प्राथमिक उपचार मिळू शकणार आहे. येथील आरोग्य सुविधा सुरळीत सुरू रहावी यासाठी परिसरातील नागरिकांनी सहकार्य करावे. आरोग्यासह परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जातील. तसेच या वस्तीतील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी खासदार निधीमधून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
प्रास्ताविकामध्ये नगरीचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी वंदे मातरम् हेल्थ पोस्टची संकल्पना विषद केली. कोरोना महामारीमध्ये आरोग्य व्यवस्थेची मोठी अडचण सगळीकडे निर्माण झाली. गोरगरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांचेच हाल झाले. आपल्या शहरात राहणा-या प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्य सुविधा मिळावी. त्याला वेळेवर प्राथमिक उपचार मिळावे यासाठी ज्या भागात आरोग्य सुविधा उपलब्ध नाही. अशा झोपडपट्टी भागामध्ये ७५ हेल्थ पोस्ट उभारण्याची संकल्पना पुढे आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने हे सर्व केंद्र वंदे मातरम् जन स्वास्थ्य केंद्र या नावाने असून प्रत्येक केंद्र देशासाठी प्राणाची आहुती देणारे शहीद जवानांना समर्पित करण्यात येत आहे. यासोबतच या केंद्रांवर देशभक्ती जागविणारा संदेश सुद्धा लिहीण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. परिसरातील नागरिकांनी कोरोना काळामध्ये वस्तीतील विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडीत होउ नये यासाठी स्वत: पैसे गोळा करून मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था येथील रमाई बौद्ध विहारात केल्याचे परिसरातील रहिवासी शीलाताई घोडेस्वार यांनी महापौरांना सांगितले. नागपूर शहरात इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यात आलेल्या असून पुढील वर्षी या परिसरातही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा संकल्प महापौरांनी व्यक्त केला.
भिवसेनखोरी जनस्वास्थ्य केंद्रामध्ये १० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येईल. रुग्णाला आवश्यक ते औषधे यामधून दिले जातील. रुग्णाला रक्त तपासणीची आवश्यकता असल्यास जवळच्या के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नाममात्र दरात रक्त तपासणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन धरमपेठ झोनचे सभापती सुनील हिरणवार यांनी केले.