Published On : Tue, Jul 11th, 2023

नागपुरातील ‘लि मेरिडियन’ हॉटेलमधील एका कॉर्पोरेट कार्यक्रमात‘डान्सर्स’वर पैशांची उधळण !

Advertisement

नागपूर : शहरातील ‘लि मेरिडियन’ हॉटेलमधील एका कॉर्पोरेट कार्यक्रमात चक्क ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण झाल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. या व्हिडिओमध्ये तोकडे कपडे घातलेल्या तरुणी डान्स फ्लोअरवर नाच करत होत्या व तेथे उपस्थित असलेल्या काही अतिउत्साही लोकांनी त्यांच्यावर पैशाची उधळन केल्याचे दिसत आहे.

हा कार्यक्रम एका मोठ्या सोलर इन्स्ट्रुमेंट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने आयोजित केलेल्या डीलर्स मेळाव्याचा भाग होता. या कार्यक्रमात शहरातील अनेकांनी सहभाग घेतला होता.

Advertisement

बी ग्रेड चित्रपटात दाखवल्याप्रमाणे शहरात अशा प्रकारचे नृत्य आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हॉटेल्समध्ये आयोजित कार्यक्रमांबाबत स्पष्ट दिशानिर्देश जारी केल्यावरदेखील त्याचे सर्रास उल्लंघन करण्यात आल्याचे चित्र या प्रकारातून उघडकीस आले आहे.

एका वृत्तपत्राने लि मेरिडियनचे ऑपरेशन्स मॅनेजर जितेंद्र शर्मा यांना या कृत्यासंदर्भात विचारणा केली. यावर प्रतिक्रिया देतांना ते म्हणाले की, या कार्यक्रमात काहीही वेगळे किंवा अयोग्य घडले नाही . याबाबत हॉटेलकडे सर्व आवश्यक परवानग्या होत्या. लग्नाचा कार्यक्रम किंवा कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये नृत्य नेहमीच घडते. आमच्याकडे सर्व आवश्यक परवानग्या आणि परवाने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.