नागपूर : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचा दर किरकोळ बाजारात प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांवर आलेला असतानाच कांद्याचा दर प्रतिकिलो २० रुपयांवरून ४० रुपयांवर गेला आहे. या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिश्याला मोठा फटका बसला आहे. जुलै महिन्यात टोमॅटोचे भाव २०० रुपयांपर्यंत गेले होते. अनेक ठिकाणी खानावळी, भोजनालये, हॉटेले, रेस्टॉरंट्समध्ये सॅलडमध्ये टोमॅटो नाहीसे झाले होते.
नागपूरनजीकच्या गावांमध्ये पावसाळ्यात टोमॅटोचे उत्पादन घेण्यात येत नाही. त्यामुळे नागपुरात नाशिक, संगमनेर, औरंगाबाद आणि बेंगळुरूतील मगनपल्लीहून टोमॅटोची आवक सुरू होती.
तर बेंगळुरू येथे यंदा टोमॅटोचे उत्पादन समाधानकारक झाले नव्हते. त्यामुळे टोमॅटोचे भाव वाढले होते. देशभरात टोमॅटोंपाठोपाठ कांद्याच्या दरामध्येही वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने शनिवारी कांदा निर्यातीवर ३१ डिसेंबरपर्यंत ४० टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला.केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांनी संताप व्यक्त केला आहे.