नागपूर : शहरात तृतीयपंथी असल्याचा बनाव करुन वृद्ध दाम्पत्याला लुटल्याची घटना समोर आली आहे. बजाज नगर पोलीस स्टेशनअंतर्गत ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. माहितीनुसार, लक्ष्मी नगर जैन मंदिराजवळ १७ जुलै रोजी सुधीर वानखेडे (वय 66) आणि संगीता वानखेडे (वय 55) यांच्या घरी एक किन्नर म्हणजेच तृतीयपंथी येतो.
तुमच्या घराजवळ काही कार्यक्रम आहे का, अशी विचारणा करून तो थेट वानखेडे यांच्या घरात जातो. वानखडे यांनी विरोध केल्यानंतरही किन्नर काही केल्या बाहेर निघत नाही. त्यानंतर जबरन त्या किन्नरने वानखडे यांना जिवेमारण्याची धमकी देऊन घरातील 11500 रुपये रोख घेऊन तसेच दाम्पत्याच्या प्रत्येकी 17 ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या घेऊन पळ काढल्याचे समोर आले.
या घटनेची तक्रारार वानखडे यांनी लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात कलम 318 (4) भा.न्या.स.-2023 अन्वये गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.