नागपूर : शहरात डिसेंबरच्या मध्यात सुरू झालेली थंडी अचानक गायब झाल्याचे दिसते. मात्र मागील दोन-तीन दिवसांपासून पहाटे आणि रात्रीच्या सुमारास थोडी थंडी जाणवायला लागली आहे. तसेच ढगाळ वातावरण निर्माण झाले.पण यामुळे वातावरणात उखाडा जाणवायला लागला. परंतु, ११ ते १६ जानेवारी या काळात परत एकदा थंडीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदा एल-निनो व अधूनमधून निर्माण होत असलेल्या वादळांमुळे यंदा थंडी काहीशी गायब झाल्याचे दिसते.
मध्यंतरी विदर्भात काही ठिकाणी पावसाची हजेरी लागली. शुक्रवारी शहरातही पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. त्यामुळे तापमानात वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर हळूहळू थंडीचा जोर वाढू लागला आहे. विदर्भ व नागपुरातही ११ ते १६ जानेवारी या काळात परत एकदा थंडी वाढणार असल्याचे दिसते. या काळात तापमान सरासरी तापमानापेक्षा २ ते ३ अंशांपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात विदर्भातील एखाद्या जिल्ह्यात १० अंश किंवा त्यापेक्षा कमी तापमान नोंदविले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी शहरात १६.६ अंशांची नोंद करण्यात आली, हे विशेष.