नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगून एका युवकाने गेल्या दोन वर्षांपासून हॉटेलमध्ये फुकट खाल्ले. मात्र युवकाची चोरी पकडल्यानंतर त्याने हॉटेलमालकावर चाकूने हल्ला केला. पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. ललित रामसंजीवन अग्निहोत्री (३३) रा. रामनगर, वर्धा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या हल्ल्यात जखमी झालेले हॉटेल संचालक दुर्गाप्रसाद रामनरेश पांडे (४५) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार पांडे कुटुंबाचे गणेशपेठ कॉलनीत भोजनालय आहे. गेल्या दोन वर्षांपासून ललित त्यांच्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी येत होता. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत तो होता. अनेकदा इतरांनाही पक्षाचे कार्यकर्ता असल्याचे सांगून हॉटेलमध्ये आणत होता .
मात्र जेवणाचे पैसे देत नव्हता. त्याच्यावर जेवनाचे आतापर्यंतचे ५० हजार रुपये थकित होते. काही दिवसांपूर्वी पांडे यांना समजले की, तो कोणत्याही नेत्याचा स्वीय सहायक नाही. मंगळवारी दुपारी तो पांडे यांच्या जाधव चौकातील नवीन भोजनालयात जेवण करण्यासाठी आला आणि पैसे न देताच निघून गेला. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास तो पुन्हा भोजनालया आल्यानंतर पांडे यांनी त्याला जेवणाचे पैसे मागितले. यानंतर मोठा वाद झाला.
ललितने चाकू काढून दुर्गाप्रसाद यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. जखमी दुर्गाप्रसाद यांना मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुर्गाप्रसाद यांचे भाऊ अनुज पांडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ललित विरुद्ध गुन्हा नोंदवित त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.