नागपूर : आपल्या 9 वर्षांच्या मुलाला ऑनलाइन गेम खेळण्याची परवानगी देणे एका 33 वर्षीय युट्यूबर महिलेला महागात पडले आहे. सायबर बदमाशांनी अल्पवयीन मुलाला लक्ष्य करत त्याच्या आईच्या मोबाइलफोनमधून 1.02 लाख रुपये लंपास केले.
फसवणूक करणाऱ्यांनी अल्पवयीन मुलाला गेम खेळताना त्याच्या कुटुंबाची माहिती सांगण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याला त्याच्या दीड वर्षाच्या बहिणीचे अपहरण करण्याची धमकी देऊन पैसे पाठवण्यास भाग पाडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्फिया नदीम शेख (३३, रा. वेलकम नगर, मॉडर्न स्कूलजवळ, कोराडी) हिला सायबर बदमाशांनी तिच्या मुलाकडून गुगल पे खात्याचा वैयक्तिक ओळख क्रमांक (पिन) घेतल्यावर १.०२ लाख रुपये लुटले.
अल्फियाने पोलिसांना सांगितले की, तिचा 9 वर्षांचा मुलगा अनेकदा तिच्या मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळत असतो. 20 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान, तिचा मुलगा गेम खेळत असताना त्याला 9864132854, 7618431523 आणि 8194012543 या सेल क्रमांकावरून कॉल आले. स्वत:ची एस के भाईजान आणि प्रमोद कालू अशी ओळख करून, कॉल करणाऱ्यांनी तिच्या मुलाला तिच्या गुगल पे खात्याचा पिन शेअर करण्यास भाग पाडले.
मुलाने पिन शेअर करताच त्यांनी तिच्या खात्यातून १.०२ लाख रुपये काढून घेतले. पोलिसांनी सांगितले की, मुलाने त्याच्या आईच्या Google Pay खात्यातून आरोपीला आठ वेळा पैसे ट्रान्सफर केले.
पीडितेच्या तक्रारीनंतर, कोराडी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 नुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(c)(d) नुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरु केला आहे.