नागपूर : पीडित तरुणीला प्रियकराने देवदर्शनाला नेत असल्याचे सांगून जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यासंदर्भात पीडित तरुणीने कोराडी पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ओमप्रकाश अरुण कुदावळे (२५, रा. कोराडी) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २३ वर्षीय तरुणी आणि आरोपी कुदावळे यांच्यात प्रेमसंबंध होते. तरुणीने त्याला लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र तो वारंवार टाळत होता.
आरोपी ओमप्रकाश अरुण कुदावळे काही दिवसानंतर तो तिच्या घरी आला. घरात कुणीही नसल्याचा फायदा घेऊन त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तो वारंवार तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिचे लैंगिक शोषण करायचा. २९ मार्चला त्याने पीडित तरुणीला घरी नेले आणि शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने लग्नाचा विषय काढला असता तिला मारहाण करत बदनामीची धमकी देत लग्नास नकार दिला. एकेदिवशी आरोपी तरुणीला देवदर्शन करायला घेऊन जातो, असे सांगून तो दुचाकीने तिला जंगलात घेऊन गेला. जंगलात गाडी थांबवून तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिला असता त्याने लग्न करण्यास नकार देण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान याप्रकरणी तरुणीने कोराडी पोलीस स्टेशन गाठले आणि प्रियकराविरुद्ध बलात्कार केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रियकर ओमप्रकाश कुदावळेला अटक केली आहे.