नागपूर : मआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजीवनगर स्मशानघाटावजवळील देशी दारूच्या दुकानात हप्ता वसुलीसाठी आलेल्या आरोपींनी एका ग्राहकालाच लुटून पळ काढला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.अक्षय दयाराम सूर्यवंशी (२४, राजीवनगर), आकाश उर्फ राहुल कमलेश सिंग (२४, राजीवनगर), आतीश गरीबदास शेंडे (२५, वैशालीनगर), सोनू उर्फ वसीम रफीक खान (२२, राजीवनगर), तुषार गणेश पेंदाम (२३, गोंड मोहल्ला) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे
माहितीनुसार,२४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हे पाचही आरोपी राजीवनगर स्मशानघाटावजळ देशी दारूच्या दुकानात पोहोचले.
त्यांनी चाकू दाखवत दुकानातील कर्मचाऱ्यांना हप्ता मागितला. जर दुकान चालवायचे असेल तर खंडणी द्यावी लागेल असे म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांना धमकावले. त्यावेळी तेथे संजय शेंडे (४०) हे ग्राहक उभे होते. आरोपींनी त्यांना चाकू दाखविला व त्यांच्या पॅंटच्या खिशातून साडेचार हजार रुपये घेऊन पळ काढला.
तसेच यासंदर्भात पोलिसांकडे वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकी आरोपींनी शेंडे यांना दिली. या घटनेनंतर शेंडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला व पाचही जणांना बेड्या ठोकल्या आहेत.