नागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अनुसिया उर्फ दिव्या श्यामकिशोर गजाम (२४, शीतला माता चौक, ईपीएफ ऑफीस क्वॉर्टर) असे मृतक महिलेचे नाव आहे. ती १० दिवसांअगोदरच पती श्यामकिशोर गजाम (२८, भजियापार, बालाघाट, मध्यप्रदेश) याच्यासह नागपुरात मजुरीच्या कामासाठी आली होती.
श्यामकिशोर तिच्यावर चारित्र्यावरून संशय घ्यायचा. यातूनच मंगळवारी रात्री त्यांच्यात वाद झाला. संतापलेल्या श्यामकिशोरने दिव्यावर लोखंडी पाईपने वार करत तिला ठार मारले. पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याने तेथून पळ ठोकला. इतर मजुरांच्या ही बाब लक्षात आल्यावर पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती देण्यात आली. लक्ष्मीप्रसाद वरखडेच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.