नागपूर : खासदार औद्योगिक महोत्सवादरम्यान स्वच्छतागृहात महिलांचे व्हिडीओ बनविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या महोत्सवाचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात तीन दिवस आयोजित करण्यात आले होते. या प्रकरणात एका शालेय शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.अंबाझरी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई करत शिक्षकाला अटक केली. मंगेश विनायक खापरे (३७, तीननल चौक, इतवारी) असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे.
माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी सायंकाळी दोन महिला स्वच्छतागृहात गेल्या असता कुणीतरी खिडकीतून व्हिडीओ बनवत असल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी बाहेर येऊन पोलिसांना ही माहिती दिली. मात्र पोलिसांनी तेथे तपासणी केली असता काहीच आढळले नाही.
हा प्रकार पोलिसांनी आयोजकांच्या कानावर टाकला. रात्री साडेसात वाजताच्या सुमारास परत एका महिलेने तशीच तक्रार केली. तिने त्याला पकडण्याचा देखील प्रयत्न केला होता. यानंतर आयोजकांनी सीसीटव्हीच्या माध्यमातून तपासणी केली असता या प्रकार उघडकीस आला.