नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पतीवर वारंवार संशय घेणाऱ्या पत्नीने त्याच्यावर थेट ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धीरज भीमराव जयपुरे (४४, विठ्ठलनगर) असे जखमी पतीचे नाव आहे. तो भाजीविक्रेता आहे. त्याचे काही वर्षांअगोदर लग्न झाले होते व पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला.
त्याने तीन वर्षांअगोदर किरण सोबत (२७) दुसरे लग्न केले होते. किरणचेदेखील हे दुसरे लग्न आहे. लग्नाच्या काही महिन्यानंतरच किरण धीरजवर संशय घेऊन लागली. वारंवार दोघांमध्ये वाद होते.
माहितीनुसार , गुरुवारी सकाळी धीरज भाजी विकण्यासाठी घरून निघाला. रात्री साडेआठ वाजता तो परतला व थकला असल्याने त्याने तिला चहा करायला सांगितले. त्यावेळी तो पलंगावर झोपून आपला मोबाईल पाहत होता. किरणने त्याला पलंगाच्या दुसऱ्या कडेला झोपायला सांगितले. धीरजने तसे केल्यावर अनपेक्षितपणे तिने त्याच्यावर ॲसिड फेकले. धीरजने तिला हाताने थांबवले व त्याच्या चेहऱ्याऐवजी अंगावर ॲसिड पडले. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला. त्याच अवस्थेत धीरजने अजनी पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांनी त्याला वैद्यकीय उपचारांसाठी नेले. त्यानंतर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात यासंदर्भात माहिती देण्यात आले. धीरजच्या तक्रारीवरून किरणवर गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.