नागपूर : आॅटो चालविणाऱ्या एका महिलेने क्षुल्लक कारणावरून अमरावती जिल्ह्यातील एका तरुणाला मारहाण करून त्याचे सात हजार रुपये लुटले. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सोमवारी दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली.
चांदूर (जि. अमरावती) येथील नीतेश सुखदेवराव मालपुरे (वय २९) हा तरुण नागपुरात आला होता. सोमवारी दुपारी तो गणेशपेठेतील मध्यवर्ती बसस्थानकाजवळून पायी जात होता. त्याच्या हातातील एक स्टॅण्ड अनवधानाने एका आॅटोला लागला. एवढ्या क्षुल्लक कारणावरून आॅटोचालक बबिता ईश्वर रामटेके हिने नीतेशला रोखले. तू आंधळा आहेस का, तुला दिसत नाही का म्हणत त्याच्याशी वाद घातला.
नीतेशने तिला समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपी बबिताने त्याला शिवीगाळ करून मारहाण केली आणि नीतेशच्या खिशातून सात हजार रुपये हिसकावून घेतले. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी बबिताची भाईगिरी सुरू होती. तिला इतरांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही ती डोळे काढत होती. नीतेशने गणेशपेठ ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.