नागपूर : वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरावती रोडवरील नाईट आऊल हॉटेलमध्ये तीन तरुणांनी एका कुटुंबावर अमानुष हल्ला केल्याने एका महिलेसह दोन जण जखमी झाले.
विक्रांत तिवारी हे त्यांचा भाऊ, वहिनी व बहिणीसह जेवणासाठी गेले होते. त्याचवेळी तेथे आरोपी कार्तिक नन्नावरे (२५), विशाल साहू (२२) व श्रेनल मेश्राम (१९) हेदेखील होते. आरोपी तिवारी यांच्या टेबलजवळ बसून हे तिघे इतर मित्रांसह वाढदिवसाची पार्टी करत होते.
नशेत असलेल्या विशालने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. महिला आणि लहान मुले असल्याने विक्रांतच्या भावाने विशालला शिवीगाळ न करण्याची विनंती केली.आपली चूक लक्षात आल्यानंतर विशालने ‘सॉरी’ म्हटले. त्यानंतर विक्रांत आणि त्याचा भाऊ जेवण करण्यात मश्गूल झाले.
विशालने ‘सॉरी’ म्हटल्यावर कार्तिक नाराज झाला.यानंतर पुन्हा वाद पेटला. विक्रांत व त्याच्या भावाने कार्तिकला समजावून शिवीगाळ न करण्यास सांगितले. त्यामुळे कार्तिक आणि त्याचे मित्र चिडले. आरोपींनी आधी विक्रांतच्या भावावर हल्ला केला. हे पाहून विक्रांत मध्यस्थी करण्यासाठी आला. त्याच्यावरही आरोपींनी हल्ला केला.
विक्रांतच्या वहिनीच्या डोक्यात दारूच्या बाटलीने प्रहार करण्यात आले.कार्तिक रॉड घेऊन विक्रांतच्या दिशेने धावला. विक्रांत तेथून बाजूला झाल्याने त्या वाराने त्याची बहीण जखमी झाली. विक्रांत, त्याचा भाऊ, वहिनी आणि बहीण जखमी झाल्याने मुलेही घाबरली. या घटनेने हॉटेलमध्ये खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याची भनक लागताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
वाडी पोलिसांनी भादंवि कलम ३२४, ५०४ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींच्या अटकेसाठी शोध सुरू करण्यात आला आहे.