नागपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने राजस्थानमध्ये घरगुती गॅस सिलेंडर ( Gas Cylinder ) 450 रुपयात देण्याचा वादा केला आहे. यावर महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात भाजपाची सत्ता असताना भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदावर आहेत. मात्र तरी देखील घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती गगनात पोहोचल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
निवडणुकांची वाट बघताय का?
राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 450 रुपये इतकी करण्यात आली. मात्र महाराष्ट्रात भाजप सत्तेत असतानाही सिलेंडरची किंमत 1100 रुपयांच्या जवळपास आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावरून काँग्रेसच्या बड्या नेत्यांनीही सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्रात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी करण्यासाठी निवडणुकांची वाट बघताय का ?असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
गृहिणींचे बजेट कोलमडले-
गेल्या एका वर्षांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमतींनी घराचे बजेट कोलमडले आहेत. 400-450 रुपयांना मिळणारे गॅस सिलेंडर थेट 1100 रुपयांच्या घरात पोहचले आहे. या दरवाढीमुळे गृहिणी संतापल्या आहेत. घरगुती गॅसच्या किंमतीत भरमसाठ होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे.