मूल: रेल्वेची धडक लागून दोन पिल्लांसहित अस्वल ठार झाल्याची घटना आज (गुरूवार) सकाळी दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
ही घटना मूल रेल्वे स्थानकापासून तीन किमी अंतरावरच्या चिचाळा बिटा अंतर्गत येणाऱ्या कम्पार्टंमेंट नंबर 536 मध्ये टोलेवाही गावाजवळ घडली. डिसेंबर 2015 मध्ये या अस्वलीने मूल जवळील रेल्वे पुलाच्या खाली या दोन पिलांना जन्म दिला होता. दाेन पिल्लांच्या जन्मानंतर ही अस्वल आपल्या पिल्लासहीत याच परिसरात आपली भ्रमंती करीत होती. पिल्लासहित झालेल्या तिच्या या दुर्दैवी घटनेमुळे वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गासहीत येथिल वन्यप्राणी मित्रांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
अस्वलीचा मृत्यू रात्रीच्या रेल्वेने झाला असावा असा अंदाज आहे. आज सकाळी चंद्रपूर ते गोंदीया जाणाऱ्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी ही घटना येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितली. रेल्वे रूळावर एका पिल्लाचा मृत्यू झाला होता. एक पिल्लू कटून बाजूला पडलेला आणि अस्वल पाण्यात पडलेली आढळली.
घटना माहित होताच वनविभागाचे अधिकारी धाबेकर, श्रीमती जगताप, क्षेत्रसहायक जांभूळे, बालपने, वनरक्षक गुरनूले, शिवनकर आणि वन्यप्राणी अभ्यासक उमेश झिरे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. पुढील शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. डिसेंबर 2015 मध्ये झालेल्या दोन पिल्लासहीत अस्वलीने ठिकठिकाणी आश्रय घेतला होता. रेल्वे रूळाच्या खाली असलेल्या पुलामध्ये जवळपास दोन महिने मुक्काम ठोकला होता. तिच्या देखरेखीसाठी वनविभागाचा एक चमू तैनात करण्यात आला होता. त्यानंतर अस्वलीने कर्मवीर महाविदयालयाच्या एका पडक्या इमारतीत आश्रय घेतला होता.त्यानंतर ती जंगलात निघून गेली होती. मूल चंद्रपूर मार्गावर अस्वलीने आपल्या दोन पिल्लासहित अनेकांना दर्शन दिले होते. या अस्वली पासून कोणताच त्रास झालेला नव्हता.